आयपीएल २०२२ मध्ये चाहत्यांना मोठे बदल पाहायला मिळणार आहे. पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये दोन नवीन संघ सहभागी होणार आहेत. याच कारणास्तव पुढच्या वर्षी आयपीएलचा मेगा लिलाव आयोजित केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयने जुन्या संघांना पुढच्या वर्षासाठी जास्तीत जास्त चार खेळाडू संघात कायम ठेवण्याची परवानगी दिली आहे. संघात कायम केलेल्या खेळाडूंना वगळता बाकिचे सर्व खेळाडू मेगा लिलावाचा भाग असणार आहेत. अशातच आता माहिती समोर येत आहे की, दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर या मेगा लिलावाच्या आधीच त्याच्या आयपीएल संघाची साथ सोडणार आहे.
अय्यरने आयपीएल २०१५ मध्ये त्याचे आयपीएल पदार्पण केले. त्याने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. त्याने त्याच्या उत्कृष्ट नेतृत्वाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाला पहिल्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवून दिले. दिल्ली संघ अय्यरच्या नेतृत्वात आयपीएलच्या १३ व्या हंगामात पहिल्यांदा अंतिम सामन्यात पोहोचला, पण या सामन्यात मुंबई इंडियन्सने त्यांचा पराभव केला होता.
आयपीएल २०१८ मध्ये अय्यरला पहिल्यांदा दिल्ली संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. त्याच्या नेतृत्वात संघ दोन वेळा आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचला आहे आणि यामध्ये एका अंतिम सामन्याचाही समावेश आहे. मात्र, आयपीएल २०२१ सुरु होण्यपूर्वी त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती आणि त्याला या हंगामातून माघार घ्यावी लागली होती. अय्यरने माघार घेतल्यानंतर रिषभ पंतला संघाचा कर्णधार केले गेले. यानंतर आयपीएलच्या या हंगामातील दुसऱ्या टप्प्यात अय्यरने संघात पुनरागमन केले होते, पण त्याला संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही आणि पंतनेच संघाचे नेतृत्व केले. पंतने या हंगामात चांगल्या प्रकारे संघाचे नेतृत्व केले आणि संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवून दिले.
याच पार्श्वभूमीवर आता अशी माहिती समोर येत आहे की, अय्यर दिल्ली कॅपिटल्स संघाची साथ सोडणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अय्यर कर्णधाराची भूमिका पार पाडण्यासाठी उत्सुक आहे आणि याच करणास्तव तो दिल्ली कॅपिटल्सची साथ सोडून मेगा लिलावाचा भाग होणार आहे. तो आयपीएलमध्ये कोणत्यातरी दुसऱ्या संघासोबत सामील होऊन त्यांचे नेतृत्व करू इच्छित आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व पुढच्या हंगामातही रिषभ पंतकडेच असू शकते.
पुढच्या हंगामात दोन नवीन संघ सहभागी होणार आहेत. याव्यतिरिक्त सनरायझर्स हैदराबाद, पंजाबि किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे संघदेखील नवीन कर्णधाराच्या शोधात आहेत. अशात श्रेयस अय्यर यापैकी कोणत्याही संघाचे कर्णधापद साभाळण्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
न्यूझीलंडविरुद्ध होणार भारताची आभासी ‘क्वार्टर-फायनल’! असे असेल उपांत्य फेरीचे समीकरण
पुणे जिल्हा राज्य निवड अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत अथर्व अगरवालचा दुसऱ्या फेरीत प्रवेश