कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर आयपीएलमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. तो सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. नुकत्याच झालेल्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्यानं 95 धावांची शानदार खेळी केली होती.
श्रेयसला एनसीए आणि डॉक्टरांनी तंदुरुस्त घोषित केलं आहे. मात्र त्याला क्रिकेट खेळताना काही खास गोष्टी लक्षात ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. डॉक्टरांनी सांगितलं की, “तो (श्रेयस अय्यर) खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे. त्यानं मुंबईतील मणक्याच्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टरांनी त्याला क्षेत्ररक्षण करताना पाय जास्त न ताणण्याचा सल्ला दिलाय.” श्रेयस अय्यर आगामी आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिसेल. तसेच तो संघाचं नेतृत्वही करणार आहे.
29 वर्षीय श्रेयस अय्यर दुखापतीमुळे गेल्या वर्षी आयपीएलमध्ये खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत नितीश राणानं केकेआरचं नेतृत्व केलं. मात्र नितीश राणाच्या नेतृत्वाखाली संघाला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. केकेआरनं 14 पैकी केवळ 6 सामने जिंकले. त्याच्या नेतृत्वाखाली संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर राहिला.
श्रेयस अय्यर आयपीएल 2024 च्या आधी कोलकाता नाईट रायडर्सच्या प्री-सीझन कॅम्पमध्ये सामील झाला आहे. त्यानं रविवारी सराव सामन्यात भाग घेत 19 चेंडूत 22 धावा केल्या. मात्र स्पिनर्सच्या विरोधात तो सहज दिसत नव्हता. तो स्थानिक फिरकीपटूविरोधात स्टेप आउट करताना स्टंप आऊट झाला.
नुकत्याच झालेल्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यानही श्रेयस अय्यर दुखापतीनं त्रस्त होता. याच कारणामुळे त्याला एनसीएमध्ये जावं लागलं. एनसीएकडून फिटनेस प्रमाणपत्र घेऊन परतलेल्या श्रेयस अय्यरनं दुखापतीमुळे रणजी सामना खेळण्यास नकार दिला होता. मात्र यामुळे तो अडचणीत आला. बीसीसीआयनं त्याला वार्षिक करारातून वगळलं. यानंतर श्रेयस अय्यरनं रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी उपांत्य आणि अंतिम सामन्यात भाग घेतला.
अंतिम सामन्यात विदर्भाविरुद्ध श्रेयस अय्यरनं शानदार फलंदाजी केली. त्यानं मुंबईच्या दुसऱ्या डावात 95 धावा ठोकल्या. त्याच्या फलंदाजीच्या जोरावर मुंबईनं धावांचा डोंगर रचला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी मुंबईचा राजा संघात दाखल, पाहा व्हिडिओ
पाकिस्तानी खेळाडूचा प्रताप! लाइव्ह मॅचदरम्यान सिगारेट ओढतानाचा व्हिडिओ व्हायरल
ट्रॉफी जिंकल्यानंतर बॉयफ्रेंडसोबत दिसली स्मृती मानधना? व्हायरल फोटोमधील ‘हा’ व्यक्ती कोण?