मुंबई। सोमवारी (१८ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात ३० वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना पार पडला. या सामन्यात कोलकाताला अखेरच्या क्षणी ७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. पण असे असले तरी, कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर याच्यासाठी हा सामना वैयक्तिकरित्या चांगला ठरला. त्याने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. याबरोबर मजेदार गोष्ट अशी की या सामन्यादरम्यान एका महिला चाहतीकडून त्याला लग्नाचीही मागणी घालण्यात आली आहे.
श्रेयस अय्यरला लग्नाची मागणी
आयपीएल २०२२ मधील (IPL 2022) ३० वा सामना ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये (Brabourne Stadium) पार पडला. या सामन्याच्या आधी स्टेडियमबाहेर एक महिला चाहती एक बोर्ड घेऊन उभी होती. त्या बोर्डवर तिने एक संदेश लिहून श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) लग्नाची मागणी (Marriage Proposal) घातली होती. त्या बोर्डवर लिहिले होते की, ‘माझ्या आईने सांगितले आहे की, लग्नासाठी मुलगा शोध, तर श्रेयस अय्यर तू माझ्याशी लग्न करशील का?’
या चाहतीचा फोटो कोलकाता नाईट रायडर्सच्या (Kolkata Knight Riders) अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करण्यात आला आहे. या फोटोवर अनेक कमेंट्स येत असून तो व्हायरल होत आहे. श्रेयस अय्यर हा भारतातील लोकप्रिय युवा खेळाडूंपैकी एक असल्याने त्याची महिला चाहत्यांमध्ये बरिच क्रेझ पाहायला मिळते.
That's one way of shooting your shot! 👏#KKRHaiTaiyaar #RRvKKR #IPL2022 pic.twitter.com/FDaO7VOXdx
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 18, 2022
श्रेयसच्या नेतृत्वाखाली कोलकाताची संमिश्र कामगिरी
आयपीएल २०२१ पर्यंत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या श्रेयस अय्यरला आयपीएल २०२२ साठी कोलकाता नाईट रायडर्सने खरेदी केले. तसेच कोलकाताने श्रेयसकडे नेतृत्वपदाचीही धूरा सोपवली. त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाताने आत्तापर्यंत आयपीएल २०२२ हंगामात सातपैकी ३ सामने जिंकले असून ४ सामने गमावले आहेत. त्यामुळे संघ सध्या गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे.
राजस्थानविरुद्ध श्रेयसचे अर्धशतक व्यर्थ
सोमवारी झालेल्या राजस्थान विरुद्ध कोलकाता (RR vs KKR) सामन्यात श्रेयस अय्यरने सलामीवीर ऍरॉन फिंचसह १०७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली होती. पण फिंच ५८ धावांवर बाद झाला. तसेच नंतर श्रेयसही ८५ धावा करून बाद झाला. या दोघांनंतर मात्र, कोणला फार काही करता आले नाही आणि कोलकाता डाव १९.४ षटकांत २१० धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे कोलकाताला ७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
तत्पूर्वी, कोलकाताने नाणेफेक जिंकत राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. राजस्थान रॉयल्सकडून सलामीवीर जोस बटलरने ६१ चेंडूत १०३ धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त संजू सॅमसनने ३८ धावांची खेळी केली. त्यामुळे राजस्थानने २० षटकांत ५ बाद २१७ धावांचा डोंगर उभा केला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022| लखनऊच्या पराभवानंतर केएल राहुलला मोठा दंड, तर स्टॉयनिसलाही फटकारलं, वाचा नक्की काय झालं
डू प्लेसिस आयपीएलमध्ये पहिल्यांदाच ९६ बाद झाला नाही, यापूर्वीही झालंय अगदी असंच, वाचा सविस्तर