दिल्ली। काल भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात फिरोज शहा कोटला स्टेडिअमवर पहिला टी २० सामना खेळवला गेला. हा सामना भारतीय वेगवान गोलंदाज आशिष नेहराचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता तर मुंबईचा प्रतिभावान खेळाडू श्रेयश अय्यरचा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता.
आशिष नेहराने २४ फेब्रुवारी १९९९ ला आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. या वेळेस आज पदार्पण करणारा खेळाडू श्रेयश अय्यर ४ वर्ष ८० दिवसांचा होता. सध्या श्रेयसचे वय २२ वर्ष आणि ३३० दिवस आहे आणि तो भारतीय संघातील वयाने सर्वात लहान सदस्य आहे.
ही आकडेवारी बघता एका वेगवान गोलंदाजाने इतक्या वर्ष क्रिकेटध्ये कारकीर्द घडवावी याचे नक्कीच कौतुक आहे.
आशिष नेहरा गेली १८ वर्ष भारतीय संघात आपल्या वेगवान गोलंदाजीचे योगदान देत आहे. तसेच त्याने आज एक मोठा विक्रम केला. भारताकडून सर्वाधिक काळ क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत नेहरा चौथ्या स्थानी आला आहे. हा खेळाडू भारताकडून तब्बल १८ वर्ष आणि २५० दिवस क्रिकेट खेळला.
दिल्लीतील फिरोज शहा कोटला हे नेहराचे घरेलू मैदान असल्याने घराच्या प्रेक्षकांसमोर निवृत्ती घेण्याची संधी असल्याने नेहराने तो या सामन्यानंतर निवृत्त होणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच घोषित केले होते.
त्याप्रमाणे आज बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेट संघाकडून नेहराला मोठा निरोप मिळाला.