भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवारी (२५ नोव्हेंबर) कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरुवात होत आहे. या सामन्यात भारतीय संघाच्या अनेक वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. यासोबतच भारतीय संघाला दुखापतींचाही सामना करावा लागत आहे. सलामीवीर केएल राहुल दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला होता, त्यानंतर त्याच्या जागी सूर्यकुमार यादवचा संघात समावेश करण्यात आला होता. यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेने कसोटी संघात अजून एका खेळाडूच्या नावाची घोषणा केली आहे.
कानपूर कसोटी सुरू होण्याच्या एक दिवस आधी, विराट कोहलीच्या अनुपस्थित कर्णधारपद सांभाळणाऱ्या अजिंक्य रहाणेने कानपूरमध्ये श्रेयस अय्यर कसोटी पदार्पण करणार असल्याची घोषणा केली आहे. अय्यरच्या पदार्पणाबाबत रहाणे म्हणाला, ‘दुर्दैवाने केएल राहुल मालिकेतील दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये संघाचा भाग असणार नाही. अशा परिस्थितीत श्रेयस कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे.’
जर २६ वर्षीय श्रेयस अय्यरला कानपुर कसोटीमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली तर तो भारताकडून कसोटी क्रिकेट खेळणारा ३०३ वा खेळाडू ठरेल. याच वर्षी अक्षर पटेल भारताकडून इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेट खेळणारा ३०२ वा खेळाडू ठरला.
भारतीय संघाकडून २२ एकदिवसीय आणि ३२ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला श्रेयस अय्यर देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतो. मुंबईकडून खेळताना, अय्यरने आतापर्यंत ५४ प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत ज्यात त्याने ९२ डावांमध्ये ८१.५४ च्या स्ट्राइक रेटने आणि ५२.१८ च्या सरासरीने ४५९२ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये १२ शतके आणि २३ अर्धशतकांचा समावेश आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये नाबाद २०२ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
भारतीय कसोटी संघ
अजिंक्य रहाणे (कर्णधार), सूर्यकुमार यादव, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अश्विन, आर. पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मो. सिराज, प्रसीध कृष्ण.