कानपूर। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात ग्रीन पार्क स्टेडियमवर पहिला कसोटी सामना गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) खेळवला गेला. या सामन्यात भारताचा फलंदाज श्रेयस अय्यरने आपल्या फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याने दोन्ही डावात भारताकडून सर्वाधिक धावा केल्या.
विशेष म्हणेज या सामन्यातून श्रेयस अय्यरने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. तो कसोटी खेळणारा भारताचा ३०३ वा खेळाडू ठरला आहे. त्याने मिळालेल्या या संधीचा पुरेपुर फायदा घेत पहिल्या डावात १७१ चेंडूत १०५ धावांची शतकी खेळी केली. तसेच दुसऱ्या डावात त्याने १२५ चेंडूत ६५ धावा केल्या. त्यामुळे त्याने एक इतिहास रचला आहे.
श्रेयस अय्यर पदार्पणाच्या कसोटीत शतक आणि अर्धशतक करणारा पहिलाच भारतीय ठरला आहे. यापूर्वी असा कारनामा कोणलाही करता आला नव्हता. याबरोबरच पदार्पणाच्या कसोटीत एका डावात शतक आणि दुसऱ्या डावातही ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा तो जगातील १६ वा खेळाडू ठरला आहे.
हा पराक्रम करणारा तिसरा भारतीय
कसोटी पदार्पणाच्या सामन्यात दोन्ही डावात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा श्रेयस अय्यर हा तिसरा भारतीय ठरला आहे. यापूर्वी असा विक्रम दिलवार हुसेन आणि सुनील गावसकर यांनी केला होता. दिलवार हुसेन यांनी कोलकाता येथे इंग्लंडविरुद्ध १९३४ साली कसोटी पदार्पण करताना ५९ आणि ५७ धावांच्या खेळी केल्या होत्या. तसेच सुनील गावसकर यांनी १९७१ साली वेस्ट इंडिज विरुद्ध पोर्ट ऑफ स्पेन येथे कसोटी पदार्पण करताना ६५ आणि नाबाद ६७ धावांची खेळी केली होती.
गावसकरांनंतर तब्बल ५० वर्षांनी एका भारतीय क्रिकेटरने असा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे श्रेयस अय्यरला त्याच्या पदार्पणाची कॅप गावसकरांच्या हस्ते प्रदान करण्याच आली होती.
सामन्यावर भारताची पकड
या सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३४५ धावा केल्या होत्या. तसेच न्यूझीलंडने पहिल्या डावात सर्वबाद २९६ धावा केल्या. त्यामुळे भारताला ४९ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर भारताने दुसरा डाव ७ बाद २३४ धावांवर घोषित केला आणि न्यूझीलंडला विजयासाठी २८४ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवसाखेर न्यूझीलंडने ४ षटकात १ बाद ४ धावा केल्या. आता अखेरच्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी २८० धावांची गरज आहे, तर भारताला ९ विकेट्सची आवश्यकता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हार्दिकने घेतलाय धक्कादायक निर्णय! भविष्याबाबत निवडकर्त्यांना सांगितले…
मुंबईकर श्रे’यश’चा कानपूरमध्ये बोलबाला; पदार्पणातच मिळवले रोहित, शिखरच्या पंक्तीत स्थान
भारताला नडतोय जेमिसन! अश्विनला बाद करताच नावावर केला मोठा पराक्रम