भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे श्रेयस अहमदाबाद कसोटीत फलंदाजी करू शकत नव्हता. आता त्याच्या या दुखापतीबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. यामुळे श्रेयस मोठ्या कालावधीसाठी क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहू शकतो.
मागील आठवड्यात अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या भारत ऑस्ट्रेलिया कसोटीचा चौथा दिवस सुरू होण्यापूर्वी श्रेयसने आपल्या पाठीमध्ये वेदना होत असल्याची तक्रार केली होती. यानंतर त्याला अहमदाबाद येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. बराच काळ त्याला हॉस्पिटलमध्ये विविध स्कॅन करावे लागले. यावरून त्याची दुखापत काहीशी गंभीर असल्याचे सांगितले गेले. श्रेयसच्या पाठीच्या खालच्या भागात ही दुखापत झाली आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, श्रेयसच्या पाठीची दुखापत गंभीर आहे. यामुळे त्याला चार ते पाच महिने क्रिकेटच्या मैदानावर उतरता येणार नाही. त्याच्यावर शस्त्रक्रिया होऊन पूर्णता बरे होण्यासाठी हा कालावधी लागेल.
या कालावधीत तो आयपीएलच्या आगामी हंगामात खेळू शकणार नाही. आयपीएलमध्ये तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व करतो. हा कोलकाता संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्याचवेळी भारतीय संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश देखील केला आहे. श्रेयस कसोटी संघाचा भाग असल्याने, तो या अतिमहत्त्वाच्या सामन्याला देखील उपस्थित नसेल.
भारतीय संघातील अनेक प्रमुख खेळाडूंना सध्या पाठदुखीने ग्रासले आहे. हार्दिक पंड्या याच दुखापतीमुळे जवळपास वर्षभर संघाबाहेर होता. सध्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा देखील ऑगस्ट महिन्यापासून कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळला नसून, तोदेखील जुलै अथवा ऑगस्टमध्ये आपले पुनरागमन करू शकतो.
(Shreyas Iyer Likely To Be Ruled Out For 4-Month He Will Miss IPL 2023 For KKR And WTC Final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभूत होताच खचली कर्णधार स्मृती मंधाना; म्हणाली, ‘….आमचा संघ खराब आहे’
भारतात जाऊन ‘हा’ संघ जिंकणार विश्वचषक, माजी दिग्गजाच्या मते फक्त टीम इंडियाचे असेल आव्हान