भारतीय संघाचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर खांद्याच्या दुखापतीमुळे क्रिकेट मैदानापासून दूर आहे. सध्या श्रेयस लवकरच मैदानात परतण्याची तयारी करत आहे. श्रेयसने नुकताच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेयर केला आहे.
या व्हिडिओमध्ये श्रेयसने काही प्रमाणात ट्रेनिंग केलेली दिसत आहे. तो एका चढावर धावत जाताना दिसत आहे. या व्हिडिओला त्याने ‘आयसोलेटेड’ असा कॅप्शन दिले आहे. यापूर्वी देखील श्रेयसने त्याच्या वर्कआऊटचे व्हिडिओ शेअर केले होते. यातून तो आता खांद्याच्या दुखापतीतून सावरत असल्याचे संकेत मिळत आहेत.
मागील महिन्यात श्रेयसच्या खांद्यावर शस्त्रक्रिया केली गेली होती. श्रेयसला मार्चमध्ये इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती, त्यानंतर त्याला शस्त्रक्रिया करावी लागली होती.
खांद्याच्या दुखापतीमुळे श्रेयस आयपीएल 2021 स्पर्धेत देखील खेळू शकला नाही. श्रेयसच्या अनुपस्थितीत रिषभ पंतला दिल्ली संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. जर श्रेयस लवकरच पूर्णतः तंदुरुस्त झाला तर त्याला जुलैमध्ये होणाऱ्या श्रीलंका दौर्यासाठी संघात संधी दिली जाऊ शकते. भारताचा एक संघ श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळणार असून रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराहसारखे खेळाडू इंग्लंड दौऱ्यात व्यस्त असल्याने या संघात दिसणार नाहीत.
श्रेयस हा मागील काही काळापासून भारतीय संघासाठी शानदार कामगिरी करत आहे. श्रेयसने भारताकडून 21 एकदिवसीय सामने खेळले असून त्यात 44.03 च्या सरासरीने 807 धावा केलेल्या आहेत. यादरम्यान त्याने 8 अर्धशतक व 1 शतक देखील ठोकलेले आहे. श्रेयसची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या ही 103 धावा राहिलेली आहे.
तसेच श्रेयसने भारताकडून 29 टी 20 सामने देखील खेळलेले आहे. टी 20 सामन्यात त्याने 28.9 च्या सरासरीने 550 धावा केलेल्या आहेत. यादरम्यान श्रेयसने 3 अर्धशतके देखील ठोकलेली आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून अंदाज वर्तवला जात आहे की, जर श्रेयस लवकरात लवकर पूर्णतः फिट झाला तर त्याला श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाचे कर्णधारपद देखील दिले जाऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
दु:खद! माजी भारतीय क्रिकेटपटूच्या आईचे निधन, विराटने केली होती आर्थिक मदत
“म्हणून माझी कारकीर्द लांबली नाही”, उथप्पाने स्वतः सांगितले कारण