श्रीलंका विरुद्ध इंग्लंड संघात २ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील अखेरचा सामना शुक्रवारपासून (२२ जानेवारी) गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडिमवर सुरू झाला असून तिसऱ्या सत्रापर्यंत श्रीलंका संघाने ४ बाद २०१ धावा केल्या आहेत. मात्र या सामन्यातील प्रदर्शनापेक्षा जास्त एका वेगळ्याच कारणामुळे श्रीलंका संघ जोरदार चर्चेत आला आहे. श्रीलंकाचा एक युवा खेळाडू त्याच्या खोलीत संघाच्या मेडिकल स्टाफमधील एका महिला सदस्यासोबत गैरवर्तन करताना रंगेहाथ सापडल्याने ही चर्चा रंगली आहे.
श्रीलंकेतील स्थानिक माध्यमांतील वृत्तांनुसार, श्रीलंका कसोटी संघातील एका युवा फिरकीपटू अष्टपैलू खेळाडूने आपल्याच संघाच्या मेडिकल स्टाफमधील एका महिला सदस्यावर लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने संघ व्यवस्थापकाला यासंदर्भात योग्य अहवाल जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने म्हटले की, “प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आम्ही श्रीलंका कसोटी संघाचे व्यवस्थापक असांथा डि मेल यांना अहवाल देण्यास सांगितले आहे. जेणेकरुन आम्हाला माध्यमांतील वृत्तांच्या सत्यतेची पुष्टी करता येईल.”
असे असले तरी, श्रीलंका कसोटी संघाचे प्रशिक्षक मिकी ऑर्थर यांनी या प्रकरणास अमान्य केले होते. “सर्व खेळाडू जैव सुरक्षित वातावरणात राहत आहेत. त्यामुळे अशाप्रकारची घटना घडणे शक्य नाही”, असे त्यांनी म्हटले होते.
पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा दणदणीत विजय
तत्पुर्वी श्रीलंका विरुद्ध इंग्लंड संघात झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने ७ विकेट्सने यजमान संघावर मात केली होती. इंग्लंडच्या पहिल्या डावात कर्णधार जो रूटने केलेल्या द्विशतकी खेळी केली होती. १ षटकार आणि १८ चौकारांसह त्याने २२८ धावांची शानदार खेळी केली होती. प्रत्युत्तरात श्रीलंकाचा सलामीवीर लहिरू थिरिमाने याने झुंजार शतक केले.
परंतु तो बाद झाल्यानंतर इतर खेळाडूंना खास कामगिरी करता आली नाही. त्यामुळे दुसऱ्या डावात इंग्लंडला नाममात्र ७४ धावांचे आव्हान मिळाले. २५ षटकात २ विकेट्स गमावत इंग्लंडने श्रीलंकाचे आव्हान पूर्ण केले आणि सामना जिंकला.