श्री साई स्पोर्ट्स, बाल विकास यांनी मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत आणि मुंबई शहर कबड्डी असो. आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पुरुष तृतीय श्रेणी गटाची उपांत्य फेरीत प्रवेश केला. तसेच आज पासून सुरू झालेल्या पुरुष व्दितीय श्रेणी कबड्डी स्पर्धेत श्री साई, भावकोमाता, शिवनेरी स्पोर्ट्स यांनी विजयी सलामी दिली. नायगाव-मुंबई येथील भारतीय क्रीडा मंडळाच्या पटांगणात सुरू असलेल्या तृतीय श्रेणी गटाच्या उप-उपांत्य पुर्व फेरीच्या सामन्यात श्री साई स्पोर्ट्सने दादोजी कोंडदेव मंडळावर ३३-२३अशी मात करीत प्रथम उपांत्यपूर्व फेरी गाठली. मध्यांतराला १६-१५ अशी नाममात्र आघाडी घेणाऱ्या श्री साईने उत्तरार्धात मात्र जोशपूर्ण खेळ करीत हा विजय सोपा केला. संदेश पाटील, लोचन वरळीकर यांच्या आक्रमक खेळाला या विजयाचे श्रेय जाते. दादोजी कोंडदेवच्या अमर कदम, अनिकेत जाधव यांना पूर्वार्धातील जोश उत्तरार्धात कायम राखता न आल्यामुळे पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या सामन्यात बाल विकास मित्र मंडळाने आंबेवाडी क्रीडा मंडळाला ३३-०९ असे धुवून काढत उपांत्यपूर्व फेरी गाठली. नितेश सणस, गणेश चव्हाण यांच्या धारदार आक्रमणाला आंबेवाडीकडे उत्तरच नव्हते. आंबेवाडीचा धनंजय निजामपूरकर बरा खेळला.
या अगोदर झालेल्या तृतीय श्रेणी गट चौथ्या फेरीच्या सामन्यात श्री साई स्पोर्टसने सूर्यकांत व्यायाम शाळेला २७-१५; दादोजी कोंडदेवने बाल शिवाजीला ३६-३४; आंबेवाडीने लालबाग स्पोर्टसला ३४-२४; बाल विकासने नवनाथला २६-२३; यश मंडळाने श्री विजय हनुमानाला ३३-२२ असे पराभूत करीत आगेकूच केली होती.
आजपासून सुरू झालेल्या व्दितीय श्रेणी पुरुषांच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात श्री साई क्रीडा मंडळाने मध्यांतरातील ०९-१६ अशा पिछाडीवरून जय खापरेश्वरचा प्रतिकार ३२- ३० असा परतवून लावला. अथर्व मांडवकर, विकास घरत यांच्या संयमी खेळाला या विजयाचे श्रेय जाते. जय खापरेश्वरच्या अनिकेत लिंगायत, राज येरंडे यांच्या खेळ उत्तरार्धात प्रभाव पाडू शकला नाही. भावकोमाताने ओम् विद्यार्थीला ३१-२३ असे नमवले. रुपेश कांबळे, श्रीधर कांबळे भावकोमाताकडून, तर ललित शेट्टी, मयूर राऊळ ओम् विद्यार्थीकडून उत्तम खेळले.
शिवनेरी स्पोर्ट्सने सूर्यकांत स्पोर्ट्सवर ३६-२५ अशी माते केली. मध्यांतराला १९-०८ अशी आघाडी घेणाऱ्या शिवनेरीला उत्तरार्धात मात्र कडव्या प्रतिकाराला तोंड द्यावे लागले. ओमकार करणं, रोहित आवळे यांनी शिवनेरीकडून छान खेल केला. सुर्यकांतच्या सिद्धेश आर्डे, संजय खांदारे यांना उशीरा सूर सापडला. याच गटात महागाव तरुण सेवा मंडळाने सक्षम क्रीडा मंडळाचा ५५-३३ ; कासारवाडी वेल्फेअर सेंटरने भूमी कबड्डी संघाचा ३५-२८ ; प्रभादेवी स्पोर्ट्सने प्रगती मंडळाचा ४१-०६असा पराभव करीत दुसरी फेरी गाठली.