भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी या सामन्यात देखील संघाला वेगवान सुरुवात देत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. या सामन्यात रोहित शर्मा पाठोपाठ शुबमन गिल यानेही शतक ठोकले. गिलचे हे वनडे क्रिकेटमधील चौथे शतक ठरले. अद्याप आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीसच असलेल्या शुबमनने या शतकासह एका खास क्रमवारीत अव्वलस्थान पटकावले.
रोहित शर्माच्या नेतृत्वात सातत्याने सलामीला संधी मिळत असलेल्या गिलने हा विश्वास सार्थ ठरवला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील शानदार फार्म त्याने या मालिकेत कायम राखला. हैदराबाद येथील पहिल्या सामन्यात त्याने द्विशतक झळकावले होते. गिलने या सामन्यात आपल्या कारकिर्दीतील चौथे शतक झळकावताना केवळ 78 चेंडूवर 13 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 112 धावांची खेळी केली. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 300 पेक्षा जास्त धावा बनवणारा तो पहिला भारतीय फलंदाज बनला.
गिल आपल्या वनडे कारकीर्दीतील हा 21 वा सामना खेळत होता. भारतासाठी सर्वात वेगवान चार वनडे शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला. या आधी शिखर धवनने 24 वनडे सामन्यात चार शतके पूर्ण केली होती. तर, केएल राहुलने व विराट कोहलीने चार शतके पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे 31 व 33 सामने घेतले होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केल्यास दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक व पाकिस्तानचा इमाम उल हक यांनी आपल्या पहिल्या 21 सामन्यात प्रत्येकी 5 शतके मारलेली. त्यानंतर गिलसह इंग्लंडचे सर्वकालीन महान फलंदाज डेनिस एमिस यांनी पहिल्या 21 सामन्यात 4 शतके झळकावली आहेत.
(Shubman Gill Become Fastest To Four Centuries For India In ODI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लय भारी! शतकांची तिशी ओलांडणारा रोहित ठरला तिसरा भारतीय
यत्र तत्र सर्वत्र शुबमन गिल! 2022 पासूनचे आकडे पाहून नक्कीच वाटेल अभिमान