शुबमन गिलची आतापर्यंतची एकदिवसीय कारकीर्द शानदार राहिली आहे. तो सर्वात जलद दोन हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज आहे. त्यानं 47 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2328 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्यानं 6 शतकं आणि एक द्विशतकही झळकावलं.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत शुबमन गिलची कामगिरी फारशी चांगली नव्हती. मात्र तो चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत आपली छाप पाडू इच्छितो. जर तो या मालिकेत खेळला तर त्याला एक मोठी कामगिरी करण्याची संधी मिळेल.
जर शुबमन गिलनं इंग्लंडविरुद्ध 172 धावा केल्या, तर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2500 धावा पूर्ण करणारा फलंदाज बनू शकतो. दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलानं 53 एकदिवसीय सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. गिलला आमलाचा विक्रम मोडण्यासाठी अजून बरेच सामने शिल्लक आहेत. जर त्यानं पुढील दोन डावांमध्ये 172 धावा केल्या, तर तो 50 पेक्षा कमी एकदिवसीय सामन्यांमध्ये ही कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू बनेल. शुबमन गिलनं 47 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2328 धावा केल्या आहेत.
शुबमन गिलचा फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाच डावांमध्ये गिलला फक्त 93 धावा करता आल्या. दुसरीकडे, जर गिल इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी करू शकला नाही, तर यशस्वी जयस्वालला एकदिवसीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
या मालिकेनंतर भारताला फेब्रुवारी आणि मार्चमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायची आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारताचे सामने दुबई येथे खेळले जाणार आहेत. भारताचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध 20 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. सुरक्षेच्या कारणास्तव भारतानं पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला आहे.
हेही वाचा –
श्रीलंका दौऱ्यावर कर्णधारपद मिळाल्यानंतर स्टीव्ह स्मिथची प्रतिक्रिया, म्हणाला..
ताशी 150 किमी वेगाने गोलंदाजी करणारा भारतीय गोलंदाज निवृत्त, कसोटी-वनडेत केला होता कहर!
इंग्लंडचा भारतात वनडे रेकॉर्ड खूपच खराब! इतक्या वर्षांपूर्वी जिंकली होती शेवटची मालिका