भारत आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी शुबमन गिलला टीम इंडियाचा उपकर्णधार बनवण्यात आलंय. गिल यापूर्वी झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा भारतीय संघाचा कर्णधार होता. आता तो वरिष्ठ संघाचा उपकर्णधार बनला आहे. रिपोर्ट्सनुसार, आता शुबमन गिलवर आणखी एक मोठी जबाबदारी येऊ शकते. त्याला कसोटी संघाचा देखील उपकर्णधारही बनवण्यात येऊ शकतं.
भारतीय टीम मॅनेजमेंट शुबमन गिलकडे संघाचा भावी कर्णधार म्हणून पाहत आहे. वृत्तानुसार, गिलला आता वनडे आणि टी20 नंतर कसोटी संघाचाही उपकर्णधार बनवलं जाऊ शकतं. भारत आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेदरम्यान गिलला ही जबाबदारी मिळू शकते. गिलची आतापर्यंतची कारकीर्द चांगली आहे. तो आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार असून तो आता टीम इंडियामध्येही मोठ्या जबाबदारीसाठी सज्ज आहे.
टीम मॅनेजमेंटनं नुकतीच सूर्यकुमार यादवची टी20 कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर हार्दिक पांड्याला ही जबाबदारी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु असं झालं नाही. पांड्याला कर्णधारपद तर सोडा, उपकर्णधारपदही मिळालं नाही. त्यामुळे तो सध्या नेतृत्वाच्या चर्चांपासून दूर आहे. आता सूर्यासोबत शुबमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करण्यासाठी सज्ज होत आहे.
शुबमन गिल भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये फिट बसतो. तो टीम इंडियासाठी 25 कसोटी खेळला आहे. या कालावधीत त्यानं 1492 धावा ठोकल्या आहेत, ज्यामध्ये 4 शतकं आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. गिलनं भारतासाठी 44 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2271 धावा केल्या आहेत. याशिवाय त्यानं 19 टी20 सामन्यांमध्ये 505 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघात स्थान मिळालं नाही, आयपीएल विजेता खेळाडू गेला इंग्लंडला; काउंटी क्रिकेटमध्ये नशीब आजमावणार
आशिया चषक 2024 : सेमिफायनलमध्ये रेणुका सिंगचा कहर! भारताचा सलग नवव्यांदा फायनलमध्ये प्रवेश
पंजाब किंग्जचं नशीब बदलेल? रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दिग्गज बनू शकतो मुख्य प्रशिक्षक