भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघातील हरारे येथे झालेला तिसरा व अखेरचा वनडे सामना शुबमन गिल याने गाजवला. २२ वर्षीय गिलने या सामन्यात शानदार शतक केले. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने १३ धावांनी हा सामना जिंकला. त्याच्या या शानदार खेळीचे फळ त्याला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार देत करण्यात आले. यानंतर गिलने लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे.
गिलने (Shubman Gill) तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत शतक (Shubman Gill Century) झळकावले. त्याने ९७ चेंडूत १ षटकार आणि १५ चौकारांच्या मदतीने १३० धावा केल्या. ५० व्या षटकातील पहिल्या चेंडूवर ब्रॅड इवान्सने त्याची विकेट काढली. यापूर्वीही पहिल्या वनडे सामन्यात त्याची बॅट चांगलीच तळपली होती. या सामन्यात त्याने ७२ चेंडूत १ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने नाबाद ८२ धावा केल्या होत्या.
अशाप्रकारे त्याने संपूर्ण मालिकेत १२२.५ च्या सरासरीने २४५ धावा काढल्या. या प्रदर्शनासाठी त्याला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. गिलला वनडे क्रिकेटमध्ये मिळालेला हा सलग दुसरा मालिकावीर पुरस्कार (Man Of The Series) आहे. हा पुरस्कार त्याने त्याचे वडील लखविंदर सिंग (Gill Dedicate Man Of The Series To Father) यांना समर्पित केला आहे.
तसेच आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्या शतकाबद्दल प्रतिक्रिया देताना गिल म्हणाला, “निश्चितपणे हे शतक माझ्यासाठी खास आहे. हरारेच्या खेळपट्टीवर चांगली फलंदाजी करता येत होती. त्याचमुळे मी माझ्या अर्धशतकाला शतकात रुपांतरित करू शकलो. शतक करणे नेहमीच विशेष असते. मी ९ वेळा ९० धावांवर बाद झालो होतो. त्यामुळे मला हे शतक पूर्ण करायचे होते.”
A brilliant CENTURY for @ShubmanGill 👏👏
His maiden 💯 in international cricket.
Well played, Shubman 💪💪#ZIMvIND pic.twitter.com/98WG22gpxV
— BCCI (@BCCI) August 22, 2022
शतक करताना गिलला झिम्बाब्वेच्या गोलंदाजांच्या धारदार गोलंदाजीचा सामनाही करावा लागला. याबद्दल बोलताना तो म्हणाला की, “जेव्हा मी मैदानावर आलो होतो, तेव्हा झिम्बाब्वेचे काही गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करत होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध खेळणे सोपे नव्हते. पण एकदा मी सेट झालो, तेव्हा मी वेगाने धावा बनवायला सुरुवात केली. ब्रॅड इवान्स चांगली गोलंदाजी करत होता. त्यामुळे मोठी खेळी करण्यासाठी गोलंदाजांवर हल्ला करणे महत्त्वपूर्ण असते.”