भारत विरुद्ध अफगाणिस्तान आणि इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यांनंतर आयसीसीने आज (बुधवार, १० जून) पुरुष कसोटी फलंदाजी क्रमवारी जाहीर केली. यामध्ये मोठा बदल झाला असून पहिल्या स्थानावरील खेळाडूला नुकसान झाले आहे. या स्थानावर इंग्लंडचा जो रूट याचे वर्चस्व होते. आता त्याच्या संघसहकाऱ्यानेच त्याची जागा घेतली आहे. तसेच भारताचा कर्णधार शुबमन गिलला मोठा फायदा झाला आहे.
इंग्लंडचा उजव्या हाताचा फलंदाज हॅरी ब्रूकने रूटला मागे टाकत कसोटी फलंदाज क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने लॉर्ड्सवर न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कमी धावसंख्येच्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशीप सामन्याच्या पहिल्या डावात अर्धशतक झळकावले होते. हा सामना इंग्लंडने ११५ धावांनी जिंकला होता. या सामन्यात रूटची निराशा झाली. तो केवळ १ आणि ८ धावाच करू शकला.
रूट आता तिसऱ्या स्थानावर घसरला असून ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड दुसऱ्या स्थानी आला आहे. तसेच भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यामुळेही या क्रमवारीत बदल झाला आहे. भारताचा कर्णधार शुबमन गिलने या सामन्यात शतकी खेळी केली होती. त्याने १२६ धावांची खेळी केली होती. त्यामुळे त्याला या क्रमवारीत दोन स्थानांचा फायदा झाला आहे. तो दोन स्थानांनी पुढे येत आठव्या स्थानावर पोहोचला आहे.
ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ चौथ्या स्थानी कायम आहे. श्रीलंकेच्या कामिंडू मेंडिसला फायदा झाला आहे. तो एक स्थानांनी पुढे येत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. भारताचा सलामीवीर यशस्वी जायस्वालचे मात्र नुकसान झाले आहे. तो एका स्थानाने घसरून नवव्या स्थानी पोहोचला आहे. कसोटी गोलंदाजीच्या क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पहिल्या स्थानी कायम आहे.
तसेच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस ऍटकिन्सन याला सात स्थानांचा फायदा झाला आहे. तो आता दहाव्या स्थानावर आहे. तसेच तो अष्टपैलूंच्या क्रमवारीतही दोन स्थानांनी वर चढत सहाव्या स्थानी पोहोचला आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायले जेमिसन २२ व्या स्थानी आणि इंग्लंडचाच वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सन २३ व्या स्थानी आहे. दोघांनी दीर्घ विश्रांतीनंतर कसोटी क्रमवारीत पुनरागमन केले आहे.






