भारतीय क्रिकेट संघाचा ‘प्रिन्स‘ म्हणून ओळखला जाणार शुबमन गिल आशिया चषक 2023 स्पर्धेत जबरदस्त विक्रमाचा मानकरी बनला आहे. त्याने सुपर- 4 फेरीच्या अखेरच्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध 121 धावांचे झंझावाती शतक ठोकले. या शतकासोबतच तो एका वर्षात वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. विशेष म्हणजे, 2023मध्ये असा विक्रम फक्त शुबमन गिललाच जमला आहे. चला तर, त्याच्या खास कामगिरीविषयी जाणून घेऊयात…
शुबमन गिलचे शतक
बांगलादेश संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 विकेट्स गमावत 265 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून शुबमन गिल (Shubman Gill) याने डावाची सुरुवात केली. या सामन्यात शुबमन 43.4 षटकापर्यंत टिच्चून खेळत होता. शुबमनने सामन्यादरम्यान 133 चेंडूंचा सामना करत 121 धावांची शतकी खेळी केली. त्याच्या या शतकात 5 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. या शतकासह शुबमन गिलने विक्रमांचे मनोरे रचले.
सन 2023मध्ये वनडेत 1000हून अधिक धावा
शुबमन गिल हा एका वर्षात वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. त्याने या शतकासह 2023मध्ये वनडे क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा ओलांडला. विशेष म्हणजे, 1982नंतर पहिल्यांदाच 2020, 2021 आणि 2022 या सलग तीन वर्षांमध्ये कोणत्याही खेळाडूला 1000 हून अधिक धावा करता आल्या नव्हत्या. (Shubman Gill Scoring 1000 plus ODI runs in a year 2023 asia cup)
शुबमनचा असाही विक्रम
बांगलादेशविरुद्ध शुबमन गिल 121 धावा (Shubman Gill 121 Runs) ठोकताच एका वर्षात सर्वाधिक शतके करणारा खेळाडू बनला. हे त्याचे 2023मधील सहावे शतक होते. यादीत दुसऱ्या स्थानी विराट कोहली असून त्याच्या नावावर 5 शतके आहेत. तसेच, तिसऱ्या स्थानी संयुक्तरीत्या चार खेळाडू असून त्यांच्या नावावर 4 शतकांची नोंद आहे. त्या खेळाडूंमध्ये टेम्बा बावुमा, डेवॉन कॉनवे, डॅरिल मिचेल आणि नजमुल होसेन शांतो याचा समावेश आहे.
हेही वाचा-
पदार्पणवीराने दोनच चेंडूत केला रोहितचा खेळ खल्लास; सामना संपल्यानंतर म्हणाला, ‘ही माझी Dream Wicket…’
Asia Cup Finalपूर्वीच भारतीय संघाचा स्टार खेळाडू Injured, शेवटच्या क्षणी ‘हा’ पठ्ठ्या कोलंबोला रवाना