भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकतीच बॉर्डर-गावस्कर मालिका झाली. भारतीय संघाने ही मालिका 3-1 ने गमावली. या मालिकेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना शुबमन गिलची कामगिरी खूपच खराब राहिली, ज्यानंतर त्याच्यावर चोहूकडून टीका होते आहे.
2021 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गाबा कसोटीत शुबमन गिलने 91 धावांची दमदार खेळी खेळली होती. तेव्हा प्रत्येकालाच असे वाटले होते की टीम इंडियाला कसोटीसाठी एक भरवशाचा फलंदाज मिळाला आहे. तो भारतीय संघाचा “रन मशीन” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फलंदाजापेक्षा अधिक चांगली कामगिरी करु शकेल, अशी अनेकांची अपेक्षा होती, परंतु आतापर्यंत त्याच्याकडून अपेक्षेप्रमाणे कामगिरी झालेली नाही. त्यानंतर आता भारताचे माजी क्रिकेटपटु एस बद्रीनाथ यांनी गिल आणि बीसीसीआयच्या निवड समितीवर टीका केली आहे.
एस बद्रीनाथ म्हणाले की, भारतीय संघ व्यवस्थापनाकडून शुबमन गिलला कमबॅक करण्यासाठी अनेकदा संधी देण्यात आली. त्याच्यावर सर्व प्रशिक्षकांचा विश्वास आहे. पण बद्रीनाथ याबाबत सहमत नाही. त्यांचे म्हणणे आहे की, गिलला संघात स्थान मिळतंय कारण तो उत्तर भारताचा आहे. जर तो तमिळनाडूचा असता, तर त्याला वगळण्यात आलं असतं.
बद्रीनाथ पुढे म्हणाले, “जर तुम्ही धावा करु शकत नसाल, तर निदान तुम्ही आक्रमकता तरी दाखवावी आणि समोरच्या गोलंदाजांना थकवावे, ज्यामुळे चेंडू जुना होईल. धावा नाही झाल्यात तरी खेळपट्टीवर खंबीरपणे टिकून राहावे, अशी माझी इच्छा आहे.”
शुबमन गिलने या बॉर्डर-गावस्कर मालिकेत 3 सामने खेळले. त्यात त्याची कामगिरी खूपच खराब राहिली. त्यानं तीन सामन्यात अवघ्या 93 धावा केल्या. सिडनी कसोटीत त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, परंतु तसं झालं नाही. त्यामुळे आता बीसीसीआयच्या निवड समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
हेही वाचा –
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात गवसला हिरा! स्टीव्ह स्मिथच्या वाटेवर चालतोय हा युवा क्रिकेटर
मोहम्मद शमी फिटनेस अपडेट, इंग्लंडविरुद्धची मालिका खेळणार की नाही?
अफगाणिस्तान क्रिकेटसाठी मोठा क्षण! इतिहासातील पहिली कसोटी मालिका जिंकली