पुणे । महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज बीव्हीजी करंडक अखिल भारतीय मानांकन(12 व 14वर्षाखालील)टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात सिद्धार्थ मराठे याने, तर मुलींच्या गटात सानिका भोगाडे, रुमा गाईकैवारी या खेळाडूंनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत दुहेरी मुकुट संपादन केला.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत 12वर्षाखालील मुलींच्या गटात बिगरमानांकीत नगरच्या सानिका भोगाडे हिने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत पाचव्या मानांकित आदिती लाखेचा 6-3, 6-4असा संघर्षपूर्ण पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. एकेरी गटांतील विजेतेपदाबरोबरच दुहेरीत सानिकाने रुमा गाईकैवारीच्या साथीत गौतमी खैरे व सोहा पाटील या जोडीचा टायब्रेकमध्ये 7-6(8-6), 6-2असा पराभव करून विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट पटकावला.
सानिका हि तक्षिला शाळेत सातवी इय्यतेत शिकत असून अहमदनगर क्लब येथे प्रशिक्षक प्रसन्ना उकलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. 12वर्षाखालील मुलांच्या गटात दुसऱ्या मानांकित अर्णव पापरकरने अव्वल मानांकित ऋषिकेश अय्यरचा 6-3, 6-2असा सरळ सेटमध्ये पराभव करून या गटाचे विजेतेपद मिळवले. अर्णव हा न्यू इंडिया शाळेत चौथी इय्यतेत शिकत असून बाउन्स टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
14वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत बिगरमानांकीत पुण्याच्या सिद्धार्थ मराठे याने सहाव्या मानांकित मुंबईच्या अझमीर शेखचा 6-1, 6-2असा पराभव करून विजेतेपद पटकावले. सिद्धार्थ हा सिम्बायोसिस शाळेत सातवी इय्यतेत शिकत असून पीवायसी येथे प्रशिक्षक हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. मुलींच्या गटात अंतिम फेरीच्या लढतीत चौथ्या मानांकित रुमा गाईकैवारी हिने अव्वल मानांकित इरा शहाचा 6-2, 6-2असा सहज पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले.
रूमा हि डीइएस सेकंडरी शाळेत सहावी इय्यतेत शिकत असून मॅस्ट्रो येथे प्रशिक्षक प्रणव वेलणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. दुहेरीत मुलांच्या गटात सिद्धार्थ मराठे व आर्यन सुतार या जोडीने कुशल चौधरी व अर्णव ओरगंतीयांचा 6-4, 6-1असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र सरकार(क्रीडा विभाग व शालेय शिक्षण विभाग) उपसचिव राजेंद्र पवार आणि क्रीडा युवक सेवा संचालनालयचे सहसंचालक नरेंद्र सोपल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक प्रवीण झिटे आणि एआयटीए सुपरवायझर अभिनव जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी गट: अंतिम फेरी: 14वर्षाखालील मुली: रुमा गाईकैवारी(4)वि.वि.इरा शहा(1)6-2, 6-2;
14वर्षाखालील मुले: सिद्धार्थ मराठे वि.वि.अझमीर शेख(6)6-1, 6-2;
12वर्षाखालील मुली: सानिका भोगाडे वि.वि.आदिती लाखे(5)6-3, 6-4;
12वर्षाखालील मुले: अर्णव पापरकर(2)वि.वि.ऋषिकेश अय्यर(1)6-3, 6-2;
दुहेरी गट: अंतिम फेरी: मुली: रुमा गाईकैवारी/सानिका भोगाडे(3)वि.वि.गौतमी खैरे/सोहा पाटील(1)7-6(8-6), 6-2;
मुले: सिद्धार्थ मराठे/आर्यन सुतार वि.वि.कुशल चौधरी/अर्णव ओरगंती (1)6-4, 6-1;