आयपीएल २०२० च्या अंतिम सामन्याला दुबईत सुरुवात झाली. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि प्रथमच अंतिम फेरीत खेळत असलेल्या दिल्ली कॅपिटल्स यांच्यात हा सामना रंगला आहे. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर मार्कस स्टॉयनिस याला पहिल्याच चेंडूवर बाद करत, मुंबईला सनसनाटी सुरुवात करून दिली. बोल्टने स्टॉयनिसला बाद करताच आपल्या संघाच्या व स्वतःच्या खात्याच्या एक विक्रम जमा करून घेतला.
ट्रेंट बोल्टने मार्कस स्टॉयनिसला यष्टीरक्षक क्विंटन डी कॉककरवी झेलबाद केले. या बळीसह मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२० मध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला पहिल्या षटकात बाद करण्याची कामगिरी आठव्यांदा केली. विशेष म्हणजे, हे आठही बळी ट्रेंट बोल्टने मिळवले आहेत. मुंबईपाठोपाठ या क्रमवारीत राजस्थान रॉयल्सचा क्रमांक लागतो. राजस्थानने स्पर्धेत १४ सामने खेळताना पाचवेळा प्रतिस्पर्धी फलंदाजांना पहिल्या षटकात तंबूत धाडले होते.
मुंबई आणि राजस्थाननंतर सनरायझर्स हैदराबाद व किंग्ज इलेव्हन पंजाबने प्रत्येकी तीन वेळा पहिल्या षटकात बळी मिळवण्याची कामगिरी केली आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनाही प्रत्येकी दोन वेळा विरोधी संघाचे गडी पहिल्या षटकात बाद केले. तर, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर व दिल्ली कॅपिटल्स हे संघ फक्त एकदाच अशी कामगिरी करू शकले.
आयपीएल २०२० मध्ये पहिल्या षटकात सर्वाधिक बळी मिळवणारे संघ
१) मुंबई इंडियन्स- ८
२) राजस्थान रॉयल्स-५
३) सनरायझर्स हैदराबाद-३
४) किंग्ज इलेव्हन पंजाब-३
५) कोलकता नाइट रायडर्स-२
६) चेन्नई सुपर किंग्स-२
७) दिल्ली कॅपिटल्स-१
८) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर-१