पुणे येथे शनिवारी (14 जानेवारी) झालेल्या 65 व्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत नांदेडच्या शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला पराभूत करत ‘महाराष्ट्र केसरीची गदा’ पटकावली. शिवराज राक्षेच्या रूपाने महाराष्ट्राला नवा ‘महाराष्ट्र केसरी’ मिळाला. मात्र या स्पर्धेला वादाची काळी किनार लाभली. या वादाच्या केंद्रस्थानी माती विभागातील पैलवान सिकंदर शेख हा राहिला. चुकीच्या पद्धतीने गुण दिल्याने सिकंदरचा पराभव झाल्याची भावना महाराष्ट्रातील तमाम कुस्तीशौकिनांनी व्यक्त केली. आता त्याच मुद्द्यावर स्वतः सिकंदरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
माती विभागाच्या अंतिम फेरीत महेंद्र गायकवाड विरुद्ध सिकंदर शेख अशी लढत झाली होती. यामध्ये महेंद्र याने गुणांच्या आघाडीने विजय संपादन केला होता. मात्र, या सामन्याला निर्णायक क्षणी वाद निर्माण झाला. महेंद्र याने डांग डाव टाकत सिकंदरविरुद्ध 4 गुण मिळवले होते. मात्र, यावर सिकंदरच्या प्रशिक्षकांनी आक्षेप घेत दाद मागितली. त्यावर सिकंदरला एक व महेंद्र याला चार गुण असा निर्णय पंचांनी दिला. त्यामुळे पिछाडीवर असलेला महेंद्र अचानक आघाडीवर गेला. त्यानंतर सिकंदरला ही पिछाडी भरून काढता आली नाही. निर्धारित वेळेच्या समाप्तीनंतर महेंद्र याला 6-2 असे विजयी घोषित केले.
पंचांनी त्या ठिकाणी महेंद्र याला चार नव्हे तर दोन गुण द्यायला हवे होते असे अनेक जाणकार म्हणताना दिसले. या कुस्तीनंतर सोशल मीडियावर सिकंदरला मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळाली. आता याच मुद्द्यावर स्वतः सिकंदरने व्यक्त होताना म्हटले,
“तिथे काय घडले हे सर्वांनी पाहिले आहे. माझ्यावर अन्याय झाला हे सपशेल दिसते. मात्र, आता याबाबत बोलून फारसा फायदा नाही. एकदा सुटलेला तीर माघारी येत नसतो. पुढील वर्षी नक्की गदा कोल्हापूरमध्ये येईल. माझ्यावर तुम्ही करत असलेल्या प्रेमासाठी धन्यवाद”
सिकंदर शेख हा निकाली कुस्त्यांच्या आखाड्यातील नामवंत मल्ल म्हणून ओळखला जातो. सोलापूरच्या मोहोळ येथील रहिवासी असलेला सिकंदर महाराष्ट्रासह उत्तर भारतात दंगल गाजवत असतो. त्या ठिकाणी त्याला टायगर ऑफ महाराष्ट्र या टोपण नावाने ओळखले जाते. तो कोल्हापुर येथील गंगावेश विजयी तालीम येथे सराव करतो.
(Sikandar Shaikh First Reaction After Controversy In Maharashtra Kesari 2023)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाद नाद नादच! भारताचा 19 वर्षांखालील महिला विश्वचषकात विश्वविक्रम, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान
‘रोहितलाही विराटसारखी वागणूक द्या…’, गौतम गंभारची मोठी प्रतिक्रिया