भारतीय संघानं शनिवारी (22 जून) बांगलादेशचा पराभव करत उपांत्य फेरीच्या दिशेनं आगेकूच केली आहे. टीम इंडियानं बांगलादेशचा 50 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारतीय संघानं तिन्ही विभागात चांगली कामगिरी केली. टीम इंडियानं या विश्वचषकात अद्याप एकही सामना गमावलेला नाही. आता सुपर-8 मधील भारताचा शेवटचा सामना 24 जून रोजी ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर बीसीसीआयनं सोशल मीडियावर भारतीय ड्रेसिंग रूमचा एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये वेस्ट इंडिजचे महान खेळाडू सर व्हिव्हियन रिचर्ड्स दिसत आहेत. यावेळी ते भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये होणाऱ्या सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार कार्यक्रमात सहभागी होतात.
प्रत्येक सामन्यानंतर भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप खेळाडूंना सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पदकासाठी नामांकित करतात. हा ट्रेंड या विश्वचषकातही कायम आहे. सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्यापूर्वी रवी शास्त्री, युवराज सिंग आणि राहुल द्रविड यांनी खेळाडूंना हा पुरस्कार दिलाय.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, अक्षर पटेल यांना सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पदकासाठी नामांकित केलं. यानंतर रिचर्ड्स यांनी सूर्यकुमार यादवला पदक प्रदान केलं. या सामन्यात तो सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण पुरस्काराचा विजेता ठरला. सूर्यकुमार यादवनं लिटन दासचा अतिशय अप्रतिम झेल घेतला होता.
यावेळी फील्डिंग कोच टी दिलीप यांनी विवियन रिचर्ड्स यांना भारतीय ड्रेसिंग रूममध्ये बोलावलं. संपूर्ण टीमनं रिचर्ड्सन यांचं ड्रेसिंग रूममध्ये स्वागत केलं. विवियन रिचर्ड्स यांनी विराट कोहलीला मिठी मारली आणि टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी हस्तांदोलन केलं. वेस्ट इंडिजच्या या महान खेळाडूनं भारतीय संघाच्या स्पर्धेतील आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल कौतुक केलं. रिचर्ड्स यांनी असंही सांगितलं की, जर वेस्ट इंडिज या स्पर्धेतून बाहेर पडला, तर तो भारतीय संघाला पाठिंबा देईल.
व्हिव्हियन रिचर्ड्स म्हणाले, “तुम्ही खूप चांगले खेळत आहात. आधीच इतक्या ताकदवान संघाबद्दल मी काय सांगू? तुम्हाला माहीत आहे, तुम्ही इथे चांगलं खेळत आहात. मी एवढेच म्हणेन की, जर वेस्ट इंडिजचा संघ बाद झाला तर मी तुम्हाला पाठिंबा देईन.”
या विजयासह भारतीय संघाचे गट 1 मध्ये दोन सामन्यात दोन विजयासह चार गुण झाले असून संघ अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 2 सामन्यांत 2 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर अफगाणिस्तानही तेवढ्याच गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. बांगलादेशला अद्याप आपलं खातं उघडता आलेलं नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
हार्दिक-कुलदीपच्या झंझावातात बांगलादेश उडाला! टीम इंडियाचं सेमीफायनलमधील स्थान जवळपास पक्कं
आता वर्ल्ड कप आपलाच! हे आहेत भारताच्या बांगलादेशवरील दणदणीत विजयाचे 5 नायक
अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार दुखावला, भारताला इशारा देत केलं मोठं वक्तव्य