वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 70 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. यादरम्यान भारतीय संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याने वनडे क्रिकेटमध्ये आपले 50 वे शतक पूर्ण केले. त्यानंतर त्याचे जगभरातून कौतुक होत आहे. या सामन्यासाठी मैदानावर हजर असलेले वेस्ट इंडीजचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सर विवियन रिचर्ड्स यांनी देखील प्रत्यक्ष भेट घेत त्याचे कौतुक केले.
विराट याने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत 49 वनडे शतके पूर्ण केली होती. उपांत्य सामन्यात आपल्या डावाची सुरुवात करताना त्याने काहीसा संयम दाखवला. मात्र, नजर बसल्यानंतर त्याने आक्रमक फटके खेळले. त्याने 113 चेंडू खेळताना 117 धावा बनवल्या. यामध्ये नऊ चौकार व दोन षटकारांचा समावेश होता. त्याने याबरोबरच सचिन तेंडुलकर याचा वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडीत काढला.
भारतीय डावाच्या समाप्तीनंतर सर रिचर्ड्स यांनी विराटची भेट घेतली. विराटला मिठी मारत ते म्हणाले,
“शानदार ब्रदर, तू दुसऱ्या ग्रहावरून आलेला आहे. अप्रतिम खेळलास”
रिचर्ड्स यांनी या सामन्यात काही काळ समालोचन देखील केले. या सामन्याचा विचार केल्यास भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारतीय संघासाठी विराट कोहली व श्रेयस अय्यर यांनी शतके झळकावत संघाला 397 अशी मोठी धावसंख्या उभारून दिली. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघासाठी डेरिल मिचेल याने शानदार शतक पूर्ण केले. मात्र, तरी देखील न्यूझीलंड संघाला 70 धावांनी पराभूत व्हावे लागले.
(Sir Vivian Richards Praised Virat Kohli After His 50 ODI Century)
हेही वाचा-
Semi Final जिंंकल्यानंतर इमोशनल झाले भारतीय खेळाडू, अश्विनने हाताचे चुंबन घेताच शमी म्हणाला, ‘उत्तर देऊन…’
टीम इंडियाला मिळणार नवे कोच? वर्ल्डकप जिंकला तरी होणार द्रविड यांचे पॅकअप?