माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. हा शॉट खेळताना, चेंडू बॅटला लागला, की तो थेट मैदानाबाहेरच जात असतो. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी त्याच्या या शॉटची नक्कल करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु क्वचितच असे फलंदाज आहेत, ज्यांना हा शॉट खेळण्यात यश येते. अशाच एका फलंदाजाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्याची फलंदाजी पाहून तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसेल.
सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून एका लहान मुलाचा फलंदाजी करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हा लहान मुलगा धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटची नक्कल करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समलोचक आकाश चोप्राने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
आकाश चोप्रा आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अनेक स्थानिक आणि राष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या आगळ्या वेगळ्या शॉटचे व्हिडिओ, आपल्या आवाजात समालोचन करून शेअर करत असतो. अशातच त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एक ६ वर्षाचा मुलगा तुफान फटकेबाजी करताना दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर त्याने धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटची हुबेहूब नक्कल केली आहे. आकाश चोप्राच्या समालोचनामुळे हा व्हिडिओ आणखी जास्त शेअर केला जात आहे. आकाश समालोचन करताना म्हणाला, “हा लहान मुलगा हेलिकॉप्टर उडवतो. असे दिसून येत आहे की या चिमुकल्याला फक्त टी२० क्रिकेट खेळायचे आहे. सर्व शॉट हवेतच खेळत आहे. याच्या कारकिर्दीची गाडी हवेतच उडत आहे. एखादा शॉट जमिनीवर पण खेळ मित्रा.”
https://www.instagram.com/reel/CPp5TLRDaOI/?utm_medium=copy_link
व्हिडिओ मधील हा छोटा मुलगा एखाद्या प्रोफेशनल क्रिकेटपटूसारखे शॉट खेळताना दिसून येत आहे. त्याचा हेलिकॉप्टर शॉट चाहत्यांच्या पसंतीचा ठरत आहे. भारताला क्रिकेटपटूंची खाण म्हणतात, हे या छोट्या क्रिकेटपटूने दाखवून दिले आहे. लवकरच आयपीएल स्पर्धा पुन्हा सुरू होणार आहे. या स्पर्धेत धोनीच्या बॅटमधून हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडला पोहोचताच स्मृती मंधानाच्या वेळापत्रकात होतो हा महत्वाचा बदल
भारतीय संघासाठी आनंदाची बातमी! लॉर्डस कसोटीत दिसून आली न्यूझीलंडची ही कमजोरी
आयपीएल नाहीतर ही लीग सर्वोत्तम, आंद्रे रसेलचे धक्कादायक विधान