पुणे, 10 जुलै 2017ः जगातील युवकांसाठी सर्वाधिक देशांचा सहभाग असलेल्या गोथिया करंडक 2017 फुटबॉल स्पर्धेसाठी एसकेएफ इंडिया यांच्या तर्फे 17 वर्षाखालील मुले आणि 12 वर्षाखालील मुली असे दोन संघ जाहिर करण्यात आले आहेत. या संघांमध्ये एसकेएफ स्पोर्टस् एज्युकेशन प्रोग्रामअंतर्गत प्रशिक्षण देण्यात आलेल्या पिंपरी चिंचवडमधील महानगपालिकेच्या शाळेतील खेळाडूंचा समावेश आहे. समाजातल्या व़ंचित वर्गातील मुला-मुलींना क्रीडा क्षेत्रामध्ये प्रशिक्षण देऊन तसेच, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा अनुभव देण्यासाठी एसकेएफच्या वतीने सुरू असलेल्या सामाजिक सेवा योजनेअंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रवण हार्डीकर, स्वीडनचे भारतांतील राजदूत उलरिका सुंदबर्ग, एसकेएफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक शिशिर जोशीपुरा यांच्या उपस्थितीत हे संघ जाहिर करण्यात आले. यावेळी एसकेएफ इंडियाच्या गुणवत्ता नियंत्रण आणि प्रामाणिकरण विभागाचे संचालक श्रीकांत सवांगीकर, एसकेएफ इंडियाच्या एचआर संचालक अंजली बायसी आदी मान्यवर उपस्थित होते.
एसकेएफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक शिशिर जोशीपुरा म्हणाले की, गोथिया करंडक 2017 स्पर्धेसाठी आमच्या स्पोर्टस् अकादमीमधील नवीन भारतीय संघ जाहिर करताना मला खुप अभिमान वाटत आहे. स्थानिक सामाजिक उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी एसकेएफ कटिबध्द आहे. स्थानिक खेळाडूंना क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे त्यांना स्पोर्टस् अकादमीमध्ये सहभागी होण्याकरिता प्रोत्साहन देणे आणि सहभागी झालेल्या मुलांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देऊन गोथेनबर्ग येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देणे, तसेच तेथील विविध देशांतील मुलांबरोबर सहभागी होण्याची व मैत्री करण्याची संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा एक भाग आहे. सलग सातव्या वर्षी आम्ही हा उपक्रम राबवित असल्यामुळे आम्हांला खुप आनंद झाला आहे.
12 वर्षाखालील गटांतील खेळाडू या स्पर्धेत एसकेएफ इंडियाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. पुणे आणि अहमदाबाद येथील एसकेएफ स्पोर्टस् अकादमी येथे कौशल्यपूर्ण प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात आलेल्या 11 ते 13 वयोगटांतील गुणवान खेळाडूंची निवड या संघांमध्ये करण्यात आली आहे. तसेच, पुणे विभागात एसकेएफ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मीट द वर्ल्ड’ या स्पर्धेच्या माध्यमातून या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
पुणे आणि अहमदाबाद येथील एसकेएफ स्पोर्टस् अकादमीमध्ये युवा गुणवान खेळाडूंना वाव देऊन आणि त्यांना क्रीडा कौशल्य उपलब्ध करून देण्यास मदत करतात. तसेच, या अकादमीमध्ये युवा फुटबॉलपटूंसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि त्यामध्ये करिअर मार्गदर्शन, समुपदेशन, अभियोग्यता चाचणी, व्यक्तिमत्व विकास आणि शैक्षणिक तंत्रज्ञान यांचा समावेश असून त्यांना यामुळे विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावण्यासाठी मदत मिळते. याव्यतिरिक्त या मुलांसाठी पालकांना पालकत्व आणि समुपदेशन कार्यशाळेचेदेखील आयोजन करण्यात येते. गोथिया करंडक 2017 स्पर्धा गोथेनबर्ग, स्वीडन येथे 16 जुलै ते 22 जुलै 2017 या कालावधीत होणार आहे.
मुले: चेतन सावंत, जय सकत, हर्षद मुटकुळे, गौरीशंकर टोंगळे, अरबाज मुजुमदार, नारायण गिरी, राहुल खरात, शफी खान, अर्जुन भालेराव, अकिब अन्सारी, अखलक अन्सारी, नीरज माने, हार्दिक मकवना, राहुल गोहिल, आर्यन सोळंकी, अम्रेश कामनाळे, प्रशिक्षक-नौशाद बोधानवाला
मुली: निशा पारसे, राहीन शेख, रोशनी पंडित, अनुज क्षीरसागर, मेहेक शेख, माया रबरी, अरुणा चौहान, रोशनी नाईक, खुशबू सरोज, दिव्या ठाकूर, माहिया चौहान, सुनीता रावळ, प्रशिक्षक-ललिता सैनी.