अनेक क्रिकेटप्रेमींच्या भारत-पाकिस्तान अंतिम सामना पाहण्याच्या आशांवर पाणी फेरले गेले आहे. आशिया चषक 2023 सुपर- 4 फेरीतील 5वा सामना पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका संघात खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा 2 विकेट्सने पराभव केला. त्यामुळे श्रीलंका थेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. आता भारत विरुद्ध श्रीलंका संघात 17 सप्टेंबर रोजी अंतिम सामना खेळला जाईल. दुसरीकडे, या लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम हा खूपच निराश झाला आहे.
आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेच्या सुपर- 4 (Super- 4) फेरीतील या पाचव्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका (Pakistan vs Sri Lanka) संघातील हा सामना 42 षटकांचा खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 42 षटकात 7 विकेट्स गमावत 252 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा बचाव त्यांना करता आला नाही. हे आव्हान श्रीलंकेने 8 विकेट्स गमावत पार केले आणि डकवर्थ लुईस नियमानुसार 2 विकेट्सने हा सामना जिंकला.
काय म्हणाला बाबर आझम?
पाकिस्तान संघाचा पराभव होताच कर्णधार बाबर आझम (Babar Azam) खूपच निराश दिसला. सामन्यानंतर त्याने आपली निराशा जाहीर करत म्हटले, “आम्ही अखेरच्या षटकात आमच्या शानदार गोलंदाजांचा वापर करण्याचा निर्णय घेतला, जो आमच्या बाजूने नव्हता.”
पुढे बोलताना बाबर म्हणाला, “त्यामुळे मी शाहीनला 41वे षटक दिले आणि नंतर आम्ही अंतिम षटकासाठी जमान खान याच्यावर विश्वास टाकला. मात्र, श्रीलंकेने चांगला खेळ दाखवला आणि त्यामुळेच त्यांचा विजय झाला. आम्ही आमच्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात पूर्ण क्षमतेने दम दाखवला नाही. त्यामुळे आम्ही पराभूत झालो. मधल्या षटकात आमचा खेळ खूपच खराब झाला, ज्याची किंमत आम्हाला पराभवाने मोजावी लागली. आम्ही सुरुवात चांगली केली, शेवटीही चांगले केले, पण मधल्या षटकात आम्ही विकेट घेऊ शकलो नाही.”
अंतिम सामन्यात श्रीलंकेपुढे भारताचे आव्हान
पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर श्रीलंकेला अंतिम सामन्याचे तिकीट मिळाले. श्रीलंका संघाने आशिया चषकात 11व्यांदा अंतिम सामन्यात जागा मिळवली आहे. आता अंतिम सामना भारत विरुद्ध श्रीलंका संघात 17 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. हा सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअम येथेच खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी एक राखीव दिवस ठेवला गेला आहे.
श्रीलंकेच्या विजयाचा हिरो कुसल मेंडिस
पाकिस्तान संगाविरुद्धच्या या विजयाचा हिरो श्रीलंकेचा यष्टीरक्षक फलंदाज कुसल मेंडिस ठरला. कुसलने संघाला सुरुवातीच्या धक्क्यातून सावरत टिच्चून फलंदाजी केली. त्याने यावेळी 87 चेंडूत सर्वाधिक 91 धावांची झंझावाती खेळी साकारली. यामध्ये 1 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. कुसलव्यतिरिक्त सदीरा समरविक्रमा (48) आणि चरिथ असलंका (49) यांनीही संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
पाकिस्तानकडून यावेळी इफ्तिखार अहमद याला सर्वाधिक 3 विकेट्स घेण्यात यश आले. तसेच, शाहीन आफ्रिदीने 2, तर शादाब खानने 1 विकेट नावावर केली. (Pak Skipper babar azam reaction pakistam defeat against sri lanka in asia cup super 4)
हेही वाचा-
अखेरच्या चेंडूवर पाकिस्तान चीत! थरारक विजयासह श्रीलंका फायनलमध्ये
बांगलादेशविरुद्ध टीम इंडियात होणार तीन बदल? अशी असेल संभाव्य प्लेइंग इलेव्हन