भारतीय संघाने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला. या विजयासह भारतीय संघाने अनेक कारनामे केले. वनडे रँकिंगमध्ये अव्वलस्थान मिळवले. त्यामुळे भारत सर्व क्रिकेट प्रकाराच्या रँकिंगमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारा संघ ठरला. त्याचबरोबर भारताने मालिकेत 1-0ने आघाडीही घेतली. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया संघ पराभूत होऊनही कर्णधार पॅट कमिन्स याने तो आनंदी असल्याचे सांगितले. चला तर, कमिन्स असे का म्हणाला जाणून घेऊयात…
या सामन्यात भारतीय कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात सर्वबाद 276 धावाच करता आल्या. यानंतर भारतीय फलंदाजांनी शानदार फलंदाजीच्या जोरावर 8 चेंडू शिल्लक ठेवून 5 विकेट्सने सामना जिंकला. या सामन्यात पाहुण्या संघाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने 9 चेंडूत 21 धावांचे योगदान दिले होते. तसेच, गोलंदाजी करताना त्याने 10 षटकात 44 धावा खर्चून 1 विकेट घेतली. मात्र, त्याचे प्रयत्न तोकडे पडले.
‘मी पुनरागमन केल्यामुळे वैयक्तिकरीत्या खूश’
सामन्यानंतर बोलताना कमिन्स म्हणाला, “पुनरागमन झाल्यामुळे मी वैयक्तिकरीत्या खुश आहे. भारतातील आपला पहिला सामना खेळून चांगले वाटले. निराशाजनक आहे की, आम्ही जिंकू शकलो नाही. मला वाटते की, काही खेळाडूंनी चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी केली. मात्र, एकूणच हे सर्व खास राहिले नाही.”
दुसरीकडे, ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि मिचेल स्टार्क (Mitchell Starc) यांच्या दुखापतीवरही तो बोलला. तो म्हणाला, “कदाचित ते दुसऱ्या सामन्यासाठीही उपलब्ध नसतील. कदाचित तिसऱ्या सामन्यात परततील. मॅक्सवेल आता भारतात आला आहे. स्मिथ आणि वॉर्नर यांना एकत्र पाहून चांगले वाटले. आमचे लक्ष मोठ्या स्पर्धेवर आहे. मात्र, तुम्हाला आधीपासूनच मानके ठरवून लयीत यायचे असते. अशात आम्हाला पुढच्या सामन्यात पुनरागमन करावे लागेल.”
दुसरा वनडे कधी?
या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ तिन्ही क्रिकेट प्रकारात जगातील अव्वल क्रमांकाचा संघ बनला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) पुढील सामना 24 सप्टेंबर रोजी इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडिअमवर खेळणार आहे. निश्चितच भारतीय संघ दुसऱ्या वनडेतही याच प्लेइंग इलेव्हनसोबत उतरून विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. आता हे पाहणे रंजक ठरेल की, ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या वनडेत कशाप्रकारे प्रदर्शन करतो. विश्वचषकापूर्वी उभय संघांसाठी ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. (skipper pat cummins statement after 1st odi loss in ind vs aus said personally happy)
हेही वाचा-
पहिल्या वनडेत कांगारूंच्या नांग्या ठेचल्यानंतर राहुलची सर्वात मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मला याची सवय…’
आयसीसी रँकिंगमध्ये भारताची एकहाती सत्ता! संघासह खेळाडूंही सर्वोत्तम स्थानांवर