Rohit Sharma Statement: भारतीय संघ बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या मायदेशात पराभवाची धूळ चारायची, या इराद्याने सेंच्युरियन कसोटीत उतरला होता. मात्र, यजमानांनी भारताचा एक डाव आणि 32 धावांनी लाजीरवाणा पराभव केला. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्यांदाच परदेशात कसोटी खेळत होता. या कसोटीत भारताचे फलंदाज आणि गोलंदाज, दोन्ही फ्लॉप ठरले. त्यामुळे भारताला पहिल्या सामन्यावर पाणी सोडावे लागले. या विजयामुळे यजमान संघ 1-0ने आघाडीवर आहे. अशात पराभवानंतर कर्णधार रोहितने मोठे विधान केले.
काय म्हणाला रोहित?
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने खराब फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही गोष्टींना पराभवाला जबाबदार ठरवले. मात्र, यावेळी रोहितने केएल राहुल (KL Rahul) याचे कौतुक केले. रोहितने 5 दिवसांचा सामना तीन दिवसात संपल्यानंतर म्हटले की, “आम्ही विजय मिळवण्यालायक प्रदर्शन केले नाही. केएलने आम्हाला चांगली धावसंख्या उभारून दिली, पण आम्ही गोलंदाजीत परिस्थितीचा फायदा उचलू शकलो नाहीत आणि त्यानंतर दुसऱ्या डावातही फलंदाजीत फ्लॉप ठरलो.”
पुढे बोलताना रोहित म्हणाला, “कसोटी सामना जिंकण्यासाठी संपूर्ण संघाने मिळून खेळणे गरजेचे आहे, जे दिसले नाही. आधीही आमचे खेळाडू इथे खेळले आहेत, आम्हाला माहितीये की, काय केले पाहिजे. प्रत्येकाचा आपला प्लॅन होता, पण तो उपयोगी पडला नाही. आमच्या फलंदाजांना आव्हान मिळाले आणि आम्ही चांगल्याप्रकारे सामना करू शकलो नाहीत. हे बाऊंड्री स्कोरिंग मैदान आहे, आम्ही अनेक धावसंख्या बनवताना पाहिले आहे, पण आम्हाला विरोधी संघ आणि त्यांची ताकद समजून घेण्याची गरज आहे. आम्ही दोन्ही डावात चांगली फलंदाजी केली नाही, त्यामुळे आम्ही इथे उभे आहोत.”
“तीन दिवसात खेळ संपल्यामुळे खूपच जास्त सकारात्मकता नाहीये, पण केएलने दाखवले की, आम्हाला अशा खेळपट्टीवर काय करण्याची गरज आहे. आमचे अधिकतर गोलंदाज याआधी इथे खेळले नाहीयेत. त्यामुळे मी जास्त टीकात्मक होऊ इच्छित नाही. आता पुन्हा एकजूट होणे आणि पुढील कसोटीसाठी तयार होण्याची गरज आहे. खेळाडू म्हणून आम्हाला अशा काळातून जावे लागते,” पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 0 धावा करणारा कर्णधार पुढे बोलताना असेही म्हणाला.
भारताचे मालिका जिंकण्याचे स्वप्न तुटले
भारतीय संघाचे आता दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्नही तुटले आहे. यावेळी भारतीय चाहत्यांना संघाकडून खूप अपेक्षा होत्या की, भारत पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकेल. पहिल्या सामन्यातील पराभवाने हे स्वप्न तुटले आहे. आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत फक्त चार कसोटी सामने जिंकला आहे. जर भारताने 3 जानेवारीपासून सुरू होणारा मालिकेतील दुसरा कसोटी सामना जिंकला, तर ही मालिका 1-1ने बरोबरीत सुटेल. हा निकाल आणण्यासाठी भारताला खूप संघर्ष करावा लागणार आहे. हा सामना केपटाऊनमध्ये होणार आहे. (skipper rohit sharma statement we were not good enough to win sa vs ind)
हेही वाचा-
Boxing Day Test । दिग्गजांनी भरलेल्या टीम इंडियावर मान खाली घालण्याची वेळ! डाव आणि 32 धावांनी तिसऱ्याच दिवशी गमावला सामना
IND vs AUS । ऑस्ट्रेलियन बॅटर्सपुढे जेमिमाहची खेळीही पडली फिकी! पाहुण्यांनी सहा विकेट्सने जिंकला पहिला सामना