गॉल। श्रीलंका विरुद्ध इंग्लंड संघात सध्या २ सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गॉल येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात रविवारी (१७ जानेवारी) चौथ्या दिवसाखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात ३ बाद ३८ धावा केल्या आहेत. त्यांना विजयासाठी अजून केवळ ३६ धावांची गरज आहे.
या सामन्यात चौथ्या दिवशी श्रीलंकेने दुसऱ्या डावात २ बाद १५६ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. यावेळी श्रीलंकेकडून लहिरु थिरिमन्नेने शतकी खेळी केली. त्याने २५१ चेंडूत १११ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १२ चौकार मारले. तसेच त्याने अँजेलो मॅथ्यूजबरोबर चौथ्या विकेटसाठी ११६ चेंडूत ५२ धावांची भागीदारी रचली. त्याला सॅम करनने डावाच्या ८३ व्या षटकात बाद केले.
यानंतर मॅथ्यूजने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला कोणीही साजेही साथ देऊ शकले नाहीत. पण त्याची निरोशान डिकवेल्लासह ४८ आणि दिनेश चंडिमलसह ३३ धावांची छोटेखानी भागीदारी झाली. त्यामुळे श्रीलंकेला दुसऱ्या डावात सर्वबाद ३५९ धावा करता आल्या. मात्र पहिल्या डावात २८६ धावांची पिछाडी स्विकारावी लागल्याने त्यांना इंग्लंडला केवळ ७४ धावांचे आव्हान देता आले.
या डावात इंग्लंडकडून जॅक लीचने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तसेच डॉम बेसने ३ विकेट्स आणि सॅम करनने २ विकेट्स घेतल्या.
इंग्लंडच्या झटपट पडल्या ३ विकेट्स
दुसऱ्या डावात श्रीलंकेने धैर्य दाखवत इंग्लंडच्या तीन फलंदाजांना झटपट बाद करत दबाव आणला होता. इंग्लंडचा पहिल्या डावात द्विशतकी खेळी करणारा कर्णधार जो रुट १ धावेवर धावबाद झाला. तर जॅक क्रॉली आणि डॉमनिक सिब्ले यांनाही काही खास करता आले नाही. हे दोघे अनुक्रमे ८ आणि २ धावा करुन लसिथ एम्बुलडेनियाच्या गोलंदाजीवर बाद झाले. त्यानंतर सध्या चौथ्या दिवसाखेर जॉनी बेअरस्टो ३७ चेंडूत ११ धावांसह नाबाद आहे. त्याला डॅनिएल लॉरेन्स २४ चेंडूत नाबाद ७ धावा करत साथ देत आहे.
पहिल्या डावात श्रीलंकेची आघाडी –
तत्पूर्वी श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात १३५ धावांवर सर्वबाद झाला होता. त्यांच्याकडून कर्णधार दिनेश चंडिमलने सर्वाधिक २८ धावा केल्या होत्या. तर इंग्लंडकडून डॉमनिक बेसने सर्वाधिक ५ विकेट्स, तर स्टुअर्ट ब्रॉडने २ विकेट्स आणि जॅक लीचने १ विकेट घेतली.
त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडकडून जो रुटने पहिल्या डावात ३२१ चेंडूत २२८ धावा केल्या. या खेळीत त्याने १८ चौकार आणि १ षटकार मारला. त्यामुळे इंग्लंडला श्रीलंकेविरुद्ध मोठी आघाडी घेण्यात यश आले. त्याच्यासह इंग्लंडकडून डॅनिएल लॉरेन्सने ७३ धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त इंग्लंडकडून पहिल्या डावात कोणत्याच फलंदाजाला ५० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. त्यांच्या खालोखाल जॉनी बेअरस्टोने ४७ धावांची खेळी केली. इंग्लंडचा पहिला डाव ४२१ धावांवर संपुष्टात आला. श्रीलंकेकडून दिलरुवान परेराने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच लसिथ एम्बुलडेनियाने ३ विकेट्स आणि असिथा फर्नांडोने २ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
आत्तापर्यंत केवळ ३ भारतीय जोड्यांनाच जमलेला ‘तो’ विक्रम आता शार्दुल-सुंदरच्याही नावावर
सिराजकडे ‘त्या’ प्रकारचा चेंडू टाकण्याची नैसर्गिक शैली आहे, सचिन तेंडुलकरने केली पाठराखण