---Advertisement---

SL vs IND 1st T20I: भारतीय गोलंदाजांपुढे श्रीलंकेची फलंदाजी निष्प्रभ; भारताने ३८ धावांनी विजयासह घेतली मालिकेत आघाडी

On: रविवार, जुलै 25, 2021 11:39 PM
---Advertisement---

कोलंबो। श्रीलंका विरुद्ध भारत संघात रविवारी (२५ जुलै) ३ टी२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने ३८ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांकडून चांगले प्रदर्शन पाहायला मिळाले. भारताकडून गोलंदाजी केलेल्या प्रत्येकाला किमान १ विकेट मिळाली.

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारताचे प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १६४ धावा केल्या होत्या. भारताकडून सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी केली होती. श्रीलंकेसमोर विजयासाठी २० षटकात १६५ धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव १८.३ षटकात १२६ धावांवर संपुष्टात आला.

भारताने दिलेल्या १६५ धावांचा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडो आणि मिनोद भानुका ही सलामीवीरांची जोडी उतरली होती. या दोघांनी श्रीलंकेला चांगली सुरुवात दिली. पण, चांगल्या सुरुवातीनंतरही मिनोद १० धावा करुन तिसऱ्या षटकात कृणाल पंड्याच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याच्यानंतर ७ व्या षटकात युजवेंद्र चहलने धनंजय डी सिल्वाला ९ धावांवर त्रिफळाचीत केले. पुढच्याच षटकात अविष्का फर्नांडो २६ धावा करुन भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनकडे झेल देत बाद झाला.

त्यामुळे श्रीलंकेने १० षटकांच्या आतच पहिल्या ३ फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या. पण त्यानंतर चरिथ असलंका आणि अशेन बंडारा यांनी श्रीलंकेचा डाव पुढे नेला. त्यांनी ४० धावांची भागीदारी केली. पण, ही भागीदारी हार्दिक पंड्याने बंडाराला ९ धावांवर १३ व्या षटकात त्रिफळाचीत करत तोडली. त्यानंतर १६ व्या षटकात असलंकादेखील बाद झाला. त्याने २६ चेंडूत ४४ धावा केल्या. या खेळीत त्याने ३ चौकार आणि ३ षटकार मारले. त्याची ही खेळी दीपक चाहरने पृथ्वी शॉच्या हातून त्याला झेलबाद करत संपुष्टात आणली.

असलंका बाद झाल्यानंतर केवळ श्रीलंकेचा कर्णधार दसून शनकाला १६ धावा करता आल्या. अन्य कोणताही फलंदाज १० धावांचा आकडाही पार करु शकला नाही.

भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच दीपक चाहरने २ विकेट्स घेतल्या, तर कृणाल पंड्या, वरुण चक्रवर्ती, युजवेंद्र चहल आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी १ विकेट घेतली.

सूर्यकुमारचे अर्धशतक

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताकडून कर्णधार शिखर धवनसह या सामन्यातून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण करणारा पृथ्वी शॉ सलामीला उतरला. मात्र, पहिल्याच चेंडूवर भारताला जबदरस्त धक्का बसला. शॉ शून्य धावेवर दुशमंथा चमिरा विरुद्ध खेळताना यष्टीरक्षक मिनोद भानुकाकडे झेल देऊन बाद झाला.

पण, त्यानंतर शिखर आणि संजू सॅमसनने भारताचा डाव सावरण्यास सुरुवात केली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र, चांगल्या सुरुवातीनंतरही सॅमसनने ७ व्या षटकात २७ धावांवर वनिंदू हसरंगाविरुद्ध खेळताना विकेट गमावली. पण यानंतर शिखरला सूर्यकुमारने भक्कम साथ दिली. या दोघांनी मिळून भारताला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला.

एका बाजूने सूर्यकुमारने आक्रमक पवित्रा स्विकारला होता. तर शिखरने दुसरी बाजू सांभाळली होती. पण शिखरला १५ व्या षटकात चमिका करुणारत्नेने बाद केले. शिखरचा झेल ४६ धावांवर अशेन बंडाराने घेतला. शिखरने ३६ चेंडूत ही खेळी करताना ४ चौकार आणि १ षटकार मारला. याबरोबरच शिखरने सूर्यकुमारबरोबर ६२ धावांची भागीदारीही केली.

शिखर बाद झाल्यानंतर १६ व्या षटकात सूर्यकुमारही अर्धशतक पूर्ण करुन बाद झाला. त्याने ३४ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारासह ५० धावा केल्या. तो देखील हसरंगाच्या गोलंदाजीवरच बाद झाला. त्याच्यापाठोपाठ हार्दिक पंड्याही केवळ १० धावा करुन माघारी परतला. अखेर इशान किशन आणि कृणाल पंड्याने भारताला १६४ धावांपर्यंत पोहचवले. इशान १४ चेंडूत २० धावांवर, तर कृणाल ३ धावांवर नाबाद राहिले.

श्रीलंकेकडून दुशमंथा चमिरा आणि वनिंदू हसरंगाने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच चमिका करुणारत्नेने १ विकेट घेतली.

भारत आणि श्रीलंकेकडून प्रत्येकी २ खेळाडूंचे पदार्पण

भारताने या सामन्यासाठी अंतिम ११ जणांच्या संघात पृथ्वी शॉ आणि वरुण चक्रवर्ती या दोघांना संधी दिली आहे. त्यामुळे या दोघांचेही आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण झाले आहे. वरुणचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील देखील पदार्पण आहे. याशिवाय श्रीलंकेकडून देखील २ खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण झाले आहे. श्रीलंकेकडून चरिथ असलंका आणि चमिका करुणारत्ने पदार्पण करत आहेत. तसेच संघात इसरु उडानाचे पुनरागमन झाले आहे.

असे आहेत ११ जणांचे संघ –

भारत – शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, इशान किशन, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती.

श्रीलंका – अविष्का फर्नांडो, मिनोद भानुका (यष्टीरक्षक), धनंजया डी सिल्वा, चरिथ असलंका, दसून शनाका (कर्णधार), अशेन बंडारा, वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, इसरु उडाना, अकिला धनंजया, दुशमंथा चमिरा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---