श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी कसोटी गॅले येथे खेळली जात आहे. पहिल्या कसोटीत श्रीलंकेनं न्यूझीलंडचा पराभव केला होता. आता दुसऱ्या कसोटीतही न्यूझीलंड पराभवाच्या उंबरठ्यावर आहे.
श्रीलंकेनं पहिला डाव 5 गड्यांच्या मोबदल्यात 602 धावांवर घोषित केला. याच्या प्रत्युत्तरात, न्यूझीलंडचा डाव अवघ्या 88 धावांवर आटोपला. यानंतर किवी संघ फॉलो ऑन खेळण्यासाठी मैदानात उतरला. दिवसअखेर न्यूझीलंडची धावसंख्या 5 विकेटवर 199 धावा आहे. त्यामुळे न्यूझीलंडवर डावानं हरण्याचा धोका आहे. सध्या किवी संघासाठी ग्लेन फिलिप्स आणि टॉम ब्लंडेल क्रीझवर आहेत.
या सामन्यात न्यूझीलंडचा दिगग्ज फलंदाज केन विल्यमसन यानं एक नकोसा रेकॉर्ड केला. तो अवघ्या 4 तासांत दोनदा बाद झाला. विल्यमसन न्यूझीलंडच्या पहिल्या डावात 7 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्यावेळी स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.25 वाजले होते. विल्यमसन न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात 46 धावा करून बाद झाला. त्यावेळी स्थानिक वेळेनुसार दुपारचे 2.15 वाजले होते. अशाप्रकारे केन विल्यमसन 4 तासांत दोनदा बाद झाला. कसोटी फॉरमॅटमध्ये फलंदाज 4 तासांत दोनदा पॅव्हेलियनमध्ये जाण्याची घटना फार दुर्मिळ आहे.
श्रीलंकेनं पहिल्या डावात 5 विकेट गमावत 602 धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडून कामेंडू मेंडिसनं नाबाद 182 धावांची खेळी केली. दिनेश चंडिमलनं 116 धावा केल्या. तर कुसल मेंडिसनं 106 धावांचं योगदान दिलं. याशिवाय अनुभवी अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूजनं 88 धावा केल्या. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सनं सर्वाधिक 3 बळी घेतले. टीम साऊदीला 1 बळी मिळाला.
यानंतर न्यूझीलंडचा पहिला डाव केवळ 88 धावांवरच आटोपला. श्रीलंकेकडून प्रभात जयसूर्यानं सर्वाधिक 6 बळी घेतले. तर निशान पेरिसला 3 विकेट मिळाल्या. याशिवाय असिता फर्नांडोनं 1 विकेट आपल्या नावे केली.
हेही वाचा –
आयपीएलमध्ये वेगानं खळबळ माजवली! आता टीम इंडियात दाखल होणार हा तुफानी गोलंदाज
मुशीर खानच्या अपघाताबाबत महत्त्वाचं अपडेट, हॉस्पिटलनं जारी केलं पहिलं स्टेटमेंट
सूर्याच्या नेतृत्वाखाली कोणाला मिळेल संधी? बांगलादेशविरुद्ध असा असू शकतो भारताचा टी20 संघ