आयपीएल 2026 मधील आपल्या आठव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला (CSK) एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. (CSK vs GT) गुजरातने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, जो त्यांच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सीएसकेच्या फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे संघाच्या नावावर काही नकोशा विक्रमांची नोंद झाली आहे.
टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नईची सुरुवात अत्यंत खराब झाली. अवघ्या 37 धावांत संघाने 4 गडी गमावले. पहिल्या 6 षटकांमध्ये चेन्नईला 3 गडी गमावून फक्त 28 धावा करता आल्या. या हंगामामधील हा दुसरा सर्वात निचांकी पॉवरप्ले स्कोअर आहे. (हैदराबादने लखनऊविरुद्ध 22 धावा केल्या होत्या). पहिल्या 10 षटकांमध्ये चेन्नईने 4 विकेट्स गमावून फक्त 43 धावा केल्या. आयपीएल 2026 मधील हा दुसरा सर्वात कमी स्कोअर आहे.
चेपॉकच्या मैदानावर पहिल्या 10 षटकांमधील हा दुसरा सर्वात निचांकी स्कोअर ठरला. यापूर्वी 2019 मध्ये आरसीबीविरुद्ध चेन्नईने 42 धावा केल्या होत्या. चेन्नईला 50 धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी तब्बल 12 षटके लागल्या. आयपीएलच्या इतिहासातील चेन्नईचे हे दुसरे सर्वात संथ (Slowest) सांघिक अर्धशतक आहे. याआधी 2011 मध्ये आरसीबीविरुद्ध त्यांनी 12.1 षटकांमध्ये 50 धावा केल्या होत्या.
संजू सॅमसन, उर्विल पटेल आणि सरफराज खान खराब शॉट मारून पॉवरप्लेमध्येच बाद झाले. डेवाल्ड ब्रेविसनेही निराशा केली, ज्यामुळे एका वेळी चेन्नईला 100 धावा करणेही कठीण वाटत होते. मात्र, कर्णधार ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) जबाबदारी स्वीकारली आणि 60 चेंडूत नाबाद 74 धावांची खेळी केली. त्याला शिवम दुबे (22 धावा) आणि जेमी ओव्हरटन (6 चेंडूत 18 धावा) यांनी साथ दिली. या जिद्दी खेळीमुळे चेन्नईने 20 षटकांमध्ये 7 गडी गमावून 158 धावांपर्यंत मजल मारली. गुजरात टायटन्ससाठी कागिसो रबाडाने 3, तर अर्शद खानने 2 विकेट्स घेतल्या.






