fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

चेंडू छेडछाड प्रकरणानंतर अखेर स्मिथ आणि वॉर्नर कर्णधार- उपकर्णधार पदावरून पायउतार

काल ऑस्ट्रेलिया खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी दरम्यान चेंडू छेडछाडीचा धक्कादायक प्रकार केला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने चेंडूंबरोबर छेडछाड केल्याचे मान्य केले होते.

तसेच जो काही गैरप्रकार काल ऑस्ट्रेलियाकडून झाला त्याची जबाबदारी स्मिथने घेतली होती. त्यामुळे स्मिथने कर्णधारपद सोडावे अशी मागणी होत होती. अखेर स्मिथला कर्णधार पदावरून तर डेव्हिड वॉर्नरला उपकर्णधार पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

याबद्दल आज सकाळीच स्मिथ चौकशी होई पर्यंत कर्णधार पदावर कायम असे सांगणारे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे जेम्स सदरलँड यांनीच आज पुन्हा एकदा स्मिथ आणि वॉर्नर नेतृत्वाच्या पदावरून पायउतार झाल्याचे सांगितले आहे.

यामुळे आता ऑस्ट्रेलिया संघाची जबाबदारी ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक टीम पेन कडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आज स्मिथ आणि वॉर्नर दोघेही टीम पेनच्या नेतृत्वाखाली खेळातील.

याबद्दल सदरलँड यांनी सांगितले की, “स्मिथ आणि वॉर्नर बरोबर चर्चा केल्यानंतर ते दोघेही कर्णधार आणि उपकर्णधार पदावरून पायउतार होण्यास तयार झाले आहेत.”

त्यांनी पुढे असेही सांगितले की हा सामना पुढे चालू राहणे गरजेचे आहे. तसेच आम्ही या प्रकरणाची चौकशीही चालू ठेवणार आहोत. खेळाडूंनी जे काही केले ते अत्यंत वाईट असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष डेव्हिड पीवर म्हणाले उर्वरित तिसऱ्या कसोटीसाठी टीम पेन कर्णधार असेल तर स्मिथ आणि वॉर्नर त्याच्या नेतृत्वाखाली खेळातील.

ते पुढे म्हणाले, “केपटाऊनमध्ये जे काही झाले त्याच्या चौकशीच्या प्रक्रियेला क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने आणि निकडची बाब म्हणून विचार करत आहोत. आम्ही सर्व माहिती घेऊन ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटसाठी योग्य निर्णय घेऊ.”

काल ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज कॅमेरॉन बॅनक्रोफ्ट आणि स्मिथने पिवळ्या रंगाचा टेप चेंडूला लावून छेडछाड केल्याचे मान्य केले होते. तसेच बॅनक्रोफ्ट पिवळ्या रंगाचा टेप त्याच्या पॅन्टमध्ये लपवत असताना टीव्ही कॅमेरामध्ये त्याची ही क्रिया कैद झाल्याने तो पकडला गेला होता.

या प्रकरणाबाबत काल पत्रकार परिषदेत या दोघांनीही चूक झाल्याची मान्य केली होती.

You might also like