क्विन्सलँड। गुरुवारपासून (३० सप्टेंबर) ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध भारतीय महिला संघात कॅरारा ओव्हल स्टेडियमवर दिवस-रात्र कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारतीय संघाकडून २५ वर्षीय स्म्रीती मंधनाने अर्धशतक झळकावले. याबरोबरच तिने एक मोठा विक्रम केला आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय महिला संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पण पहिला दिवसाचा खेळ ४४.१ षटकानंतर थांबला. यावेळी मंधना १४४ चेंडूत ८० धावा करुन नाबाद आहे. मंधनाने तिच्या या खेळीदरम्यान १५ चौकार आणि १ षटकार मारला. मंधनाने ताहलिया मॅकग्राने टाकलेल्या डावाच्या ४० व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर षटकार मारला.
त्यामुळे ती ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत षटकार ठोकणारी जगातील केवळ दुसरीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे. यापूर्वी असा विक्रम भारताच्याच डायना एडुलजी यांनी केला होता. त्यांनी १९९१ साली मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत षटकार ठोकला होता. यापूर्वी असा विक्रम कोणालाही करता आलेला नाही.
या सामन्यात पावसामुळे खेळ थांबला तेव्हा, भारतीय संघाने ४४.१ षटकात १ बाद १३२ धावा केल्या होत्या. भारताकडून मंधना ८० धावांवर खेळत आहे. तर पुनम राऊत १६ धावांवर नाबाद आहे. तसेच, शेफाली वर्मा ३१ धावांवर बाद झाली.
तब्बल १५ वर्षांनी ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना
भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तब्बल १५ वर्षांनंतर कसोटी सामना खेळत आहे. यापूर्वी या दोन संघात २००६ साली ऍडलेड येथे कसोटी सामना खेळवण्यात आला होता, ज्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. त्याचबरोबर सध्या सुरु असलेला कसोटी सामना भारतीय महिला संघाचा पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी हा सामना ऐतिहासिक आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ तिघांवर विश्वास न ठेवून संघांनी केली चूक; आज गाजवतायेत युएईची मैदाने
टी२० विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात होऊ शकतात ३ मोठे बदल, ‘या’ खेळाडूंना मिळू शकते संधी
‘क्रिकेटर कम मेंटॉर’, सामना विजयानंतर राजस्थानच्या युवा ब्रिगेडला कोहलीकडून मोलाचे मार्गदर्शन-VIDEO