---Advertisement---

स्म्रीती मंधनाचे रेकॉर्डब्रेक शतक! विश्वचषकात १२३ धावांच्या खेळीसह तीन विक्रमात पटकावले अव्वल स्थान

On: शनिवार, मार्च 12, 2022 10:18 AM
Smriti-Mandhana
---Advertisement---

हेमिल्टन। न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत शनिवारी (१२ मार्च) भारतीय महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला (India Women vs West Indies Women) संघांत सामना झाला. सेडन पार्क येथे झालेल्या या सामन्यात सलामीवीर स्म्रीती मंधना हिने शानदार शतकी खेळी साकारली. याबरोबरच तिने अनेक मोठे विक्रम रचले.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला योग्य ठरवत मंधना आणि यास्तिका भाटिया यांनी सलामीला खेळायला येत संघाला चांगली सुरुवात दिली. या दोघींनी ४९ धावांची भागीदारी रचली. पण भाटिया आक्रमक ३१ धावांची खेळी करून बाद झाली. त्यापाठोपाठ भारताने कर्णधार मिताली राज आणि दिप्ती शर्मा यांच्या विकेट्स स्वस्तात गमावल्या. पण नंतर मंधना आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यांची जोडी जमली. या दोघींनीही चौथ्या विकेटसाठी १८४ धावांची दिडशतकी भागीदारी केली.

या भागीदारीदरम्यान मंधनाने (Smriti Mandhana) ४० व्या षटकात हेली मॅथ्यूजविरुद्ध चौकार ठोकत शतकाला गवसणी घातली. तिने १०८ चेंडूत तिचे शतक पूर्ण केले. शतक पूर्ण केल्यानंतर तिने आक्रमक पवित्रा स्विकारला होता. मात्र, ४३ व्या षटकात तिला शामेलिया कॉनेलने बाद केले. मंधनाने ११९ चेंडूत १२३ धावांची खेळी करताना १३ चौकार आणि २ षटकार मारले. हे तिचे विश्वचषकातील दुसरे शतक आहे.

यापूर्वी मंधनाने वेस्ट इंडिजविरुद्धच २०१७ सालच्या विश्वचषकात शतकी खेळी केली होती. तिने त्यावेळी नाबाद १०६ धावा केल्या होत्या.

मिताली राजचा विक्रम टाकला मागे
मंधनाने शनिवारी वेस्ट इंडिजविरुद्ध केलेले शतक हे तिचे मायदेशाबाहेरील पाचवे वनडे शतक होते. त्यामुळे ती मायदेशाबाहेर ५ वनडे शतके करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. मायदेशाबाहेर महिला वनडेमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत मंधनाने मिताली राजला मागे टाकले आहे. मितालीने वनडेत ४ शतके मायदेशाबाहेर ठोकली आहेत.

वेस्ट इंडिजविरुद्ध तळपते मंधनाची बॅट
मंधनाचे हे वेस्ट इंडिदविरुद्धचे दुसरे वनडे शतक होते. ती वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेत दोन शतके करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध आत्तापर्यंत ५ महिला खेळाडूंनी वनडेत शतक केले आहे. यात मंधनाव्यतिरिक्त अरुंधती किरकिरे, मिताली राज, तिरुश कामिनी आणि हरमनप्रीत कौर यांचा समावेश आहे. यातील मंधनाशिवाय बाकी चौघींनी प्रत्येक १ शतक वेस्ट इंडिजविरुद्ध केले आहे.

त्याचबरोबर महिला विश्वचषकात (Women’s World Cup) वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वोच्च धावांची खेळी करण्याचा विक्रमही स्म्रीती मंधनाच्या नावावर नोंदवला गेला आहे. याआधी हा विक्रम न्यूझीलंडच्या सोफी डिवाईनच्या नावावर होता. तिने २०२२ च्याच विश्वचषकात १०८ धावांची खेळी वेस्ट इंडिजविरुद्ध केली होती. तसेच या यादीत तिसऱ्या क्रमांकावर निकोल बोल्टन आहे. तिने २०१७ मध्ये नाबाद १०७ धावांची खेळी केली होती, तर चौथ्या क्रमांकावर पुन्हा एकदा मंधनाचे नाव आहे. तिने २०१७ च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध केलेली नाबाद १०६ धावांची खेळी या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

कॅलिसच्या ‘त्या’ शब्दांनी जादू केली अन् दक्षिण आफ्रिकेने ४३५ धावांचे आव्हान सहज पार केले

फलंदाजीतून धावांचा पाऊस पाडणारा वॉर्नर टेनिसमध्ये आहे पटाईत; व्हिडिओ शेअर करत म्हणाला, ‘मी चांगलाच खेळतो…’

राजस्थान रॉयल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक बनल्यानंतर मलिंगाची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आयपीएलमध्ये पुनरागमन…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---