मुंबई येंथील ब्रेबॉर्न स्टेडीयमवर सुरू असणाऱ्या महिलांच्या तिरंगी टी-२० मालिकेत आज भारत विरूध्द इंग्लड असा सामना झाला. या सामन्यात इंग्लंडने जरी विजय मिळवला असला तरी भारताची सलामीवीर फलंदाज स्म्रिती मानधनाने अर्धशतक करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याच अर्धशतकाबरोबर तिने एक खास विक्रम केला आहे.
स्म्रितीने आज २५ चेंडूतच ५० धावा केल्या. याचबरोबर तिने आंतराष्ट्रीय महिला टी-२० मधील चौथ्या क्रमांकाचे तर आशियाई महिला क्रिकेटपटू म्हणून सर्वात वेगवान अर्धशतक केले. तसेच ती भारताकडूनही टी २० मध्ये सर्वात जलद अर्धशतक करणारी महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
याआधीही भारताकडून आंतराष्ट्रीय टी २० मध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा मान स्म्रितीकडेच होता. तिने मागील सामन्यातच ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३० चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
तिने आज ४० चेंडूत ७६ धावा केल्या. यात तिच्या १२ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. याचबरोबर तिला आज मिताली राजचीही चांगली साथ लाभली. मितालीनेही आज अर्धशतक केले आहे. या दोघींच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १९८ धावा केल्या होत्या.
भारताने दिलेल्या १९९ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या डॅनिएल वॅटने ५२ चेंडूत शतक साजरे केले. तिने आज ६४ चेंडूत १२४ धावा करताना १५ चौकार आणि ५ षटकार ठोकले. हे तिचे टी २० मधील दुसरे शतक आहे.
महिला टी-२०च्या इतिहासात दोन शतके करणारी ती वेस्ट इंडीजच्या डीनड्रा डोटीन नंतर दुसरी खेळाडू ठरली. तिच्या या आक्रमक शतकामुळे इंग्लंडने हा सामना इंग्लडने सात विकेट्सने सहज जिंकला.