भारताची आक्रमक फलंदाज स्म्रीती मानधनाने रविवारी (२९जुलै) किया सुपर लीगमध्ये खेळताना शानदार कामगिरी केली. तिने वेस्टर्न स्ट्रोम संघाकडून खेळताना लॉघबोरो लाइटनिंग विरुद्ध १८ चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले.
त्यामुळे आता तीने महिलांच्या ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. याआधी न्यूझीलंडच्या सोफी डीवाईनने भारताविरुद्ध ११ जुलै २०१५ ला १८ चेंडूत अर्धशतक करत टी२० क्रिकेटमध्ये जलद अर्धशतक करण्याचा विश्वविक्रम केला होता.
विषेश म्हणजे सोफी रविवारच्या या सामन्यात स्म्रीतीचा प्रतिस्पर्धी संघ लॉघबोरो लाइटनिंग संघाकडून खेळत होती.
रविवारी पावसाच्या व्यत्ययामुळे ६ षटकांच्याच झालेल्या या सामन्यात स्म्रीतीने १९ चेंडूत नाबाद ५२ धावा केल्या. यात तिने ४ षटकार आणि ५ चौकार मारले. तिने तिचे हे अर्धशतकही षटकार मारत पूर्ण केले. तिच्या अर्धशतकाच्या जोरावर वेस्टर्न स्ट्रोम संघाने प्रथम फलंदाजी करत ६ षटकात २ बाद ८५ धावा केल्या.
या धावांचे आव्हान पार करताना लॉघबोरो लाइटनिंग संघाकडून त्यांचे रॅचेल हेन्स आणि सोफि डीवाईन या सलामीवीरांनी विकेट गमावली नाही. मात्र त्यांना ६ षटकात ८६ धावांचे लक्ष्य पार करण्यात अपयश आले.
या सामन्यात सोफीने २१ चेंडूत ४६ धावांची खेळी केली तर तीला रॅचेलने १८ धावा करत साथ दिली. या दोघींना मिळून ६७ धावाच करता आल्या. त्यामुळे वेस्टर्न स्ट्रोमने १८ धावांनी विजय मिळवला.
स्म्रीती ही या लीगमध्ये खेळणारी पहिलीच भारतीय महिला आहे. या लीगमध्ये याआधी तिने तिच्या पहिल्याच सामन्यात यॉर्कशायर डायमंड्स विरुद्ध खेळताना २० चेंडूत ४८ धावा केल्या होत्या.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–गांगुलीला मागे टाकत कॅप्टन कोहली होणार नवा ‘दादा’?
–Video: हा २ वर्षांचा चिमुकला ठरला आयसीसीचा ‘फॅन आॅफ द विक’
–सौरभ वर्माला रशियन ओपनचे विजेतेपद