गेल्या महिन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करून महिला एकदिवसीय (ODI) विश्वचषक 2025 चे जेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी भारतीय महिला संघातील खेळाडू लवकरच कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये हजेरी लावणार आहेत. या भागात कर्णधार हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष आणि प्रतिका रावल यांच्यासह इतर अनेक खेळाडू दिसणार आहेत. मात्र, स्मृती मानधना कदाचित या भागाचा हिस्सा नसेल.
कपिल शर्मा शोचा एक प्रोमो व्हिडिओ नुकताच प्रदर्शित झाला असून, यात स्मृती मानधना (Smriti Mandhna) कुठेही दिसत नाही. स्मृती महिला विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी फलंदाज होती, पण गेल्या काही दिवसांत तिच्या लग्नाबाबतच्या चर्चांमुळे ती चर्चेत होती.
शोमध्ये कपिल शर्माने हरमनप्रीत कौरला त्या प्रसंगाबद्दल विचारले, जेव्हा तिने ट्रॉफी उचलण्यापूर्वी भांगडा डान्स केला होता. त्यावर जेमिमा रॉड्रिग्स गमतीने म्हणाली, हॅरी दीदी (हरमनप्रीत) आमचं कधीच ऐकत नाही, पण स्मृतीने तिला धमकी दिली होती की, जर तू भांगडा केला नाहीस तर मी तुझ्याशी आयुष्यभर बोलणार नाही.
भारतीय महिला क्रिकेटपटूंचा हा विशेष भाग 27 डिसेंबरला रात्री 8 वाजता नेटफ्लिक्स (Netflix) वर प्रदर्शित होणार आहे. या भागात सुनील ग्रोवर आणि कृष्णा अभिषेक ‘करण-अर्जुन’ च्या भूमिकेत दिसतील, तर कीकू शारदा ‘आई’च्या भूमिकेत असेल. प्रोमोमध्ये स्मृती न दिसल्याने सोशल मीडियावर तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
महिला विश्वचषक 2025 मध्ये स्मृतीने 9 डावात 54.25 च्या सरासरीने 434 धावा केल्या होत्या. तसेच, नुकताच तिने महिला टी-20 क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण करण्याचा टप्पा ओलांडला असून, अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे.






