महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 मध्ये 17 जानेवारी रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात झालेल्या सामन्यात आरसबीची कर्णधार स्मृती मानधनाने शानदार फलंदाजी करत इतिहास रचला. तिच्या आक्रमक आणि संयमी खेळीच्या जोरावर आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा 8 विकेट्सने पराभव करत चालू हंगामातील सलग चौथा विजय नोंदवला.
दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 167 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले होते. प्रत्युत्तरात आरसीबीने स्मृती मंधानाच्या जबरदस्त 96 धावांच्या खेळीच्या जोरावर हे लक्ष्य सहज गाठले. मंधानाने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत दिल्लीच्या गोलंदाजांवर दबाव आणला आणि संघाला विजयाच्या दिशेने नेले.
जरी स्मृती मानधना या सामन्यात शतकापासून केवळ 4 धावा दूर राहिली असली, तरी तिने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. ती WPLच्या इतिहासातील भारतीय खेळाडूंपैकी सर्वात मोठी वैयक्तिक खेळी करणारी फलंदाज ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या नावावर होता, जिने 2024 मध्ये नाबाद 95 धावांची खेळी केली होती. स्मृतीची 96 धावांची खेळी ही WPLमध्ये कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेली आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, WPLच्या इतिहासात अद्याप कोणत्याही खेळाडूला शतक करता आलेले नाही. या सामन्यात मानधनाकडे सुवर्णसंधी होती, मात्र ती शतकापासून थोडक्यात हुकली. तरीही तिची खेळी चाहत्यांसाठी संस्मरणीय ठरली. तिला या दमदार कामगिरीसाठी ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या विजयासह आरसीबीने गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे. संघाने आतापर्यंत खेळलेले चारही सामने जिंकले असून, आणखी एक विजय मिळाल्यास RCB या हंगामातील प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरू शकतो. स्मृतीच्या नेतृत्वाखाली आरसीबी सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत असून, WPL 2026 मध्ये त्यांचा विजेतेपदाचा दावा अधिक मजबूत होत चालला आहे.






