रविवारी(१८ ऑक्टोबर) आयपीएल २०२०मध्ये झालेल्या दोन्ही सामन्यात सुपर ओव्हरचा थरार पहायला मिळाला. मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात दुबईमध्ये पार पडलेल्या सामन्यात तर २ सुपर ओव्हर झाल्या. यावेळी दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबने बाजी मारली. पंजाबकडून दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये १२ धावांचा पाठलाग करताना ख्रिस गेलने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला आणि एक खास विक्रमही केला.
आयपीएल २०२० च्या या हंगामात आत्तापर्यंत ५ सुपर ओव्हर खेळवण्यात आल्या आहेत. यात एकूण ५६ चेंडू टाकण्यात आले आणि ४२ धावा करण्यात आल्या. तसेच केवळ १ षटकार मारण्यात आला आहे आणि तो षटकार रविवारी गेलने मारला. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये आत्तापर्यंत झालेल्या सुपर ओव्हर्समध्ये पहिला षटकार मारण्याचा विक्रम गेलच्या नावावर झाला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने ६ विकेट्स गमावत १७६ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना किंग्स इलेव्हन पंजाब संघानेही ६ विकेट्स गमावत १७६ धावा केल्या. त्यामुळे बरोबरीत सुटलेल्या या सामन्याचा निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हर खेळण्यात आली.
सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने जसप्रीत बुमराच्या विरुद्ध २ विकेट्स गमावत ५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई संघालाही मोहम्मद शमीने शानदार गोलंदाजी करत ५ धावांवरच रोखले. त्यामुळे ही सुपर ओव्हरही बरोबरीत सुटल्याने पुन्हा सुपर ओव्हर खेळावी लागली.
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ११ धावा केल्या. प्रतिउत्तरादाखल पंजाबकडून गेलने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला आणि दुसऱ्या चेंडूवर १ धाव काढली. नंतर मयंक अगरवालने २ चौकार ठोकत पंजाबचा विजय निश्चित केला.
आयपीएलमध्ये असे पहिल्यांदाच झाले की एकाच सामन्यात २ सुपर ओव्हर खेळवण्यात आल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित, रैना, विराटलाही इतक्या वर्षात जे जमलं नाही ते केएल राहुलने करुन दाखवले
सुपर ओव्हर पे सुपर ओव्हर! एकाच दिवसात ३ सुपर ओव्हर झाल्यानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पडला पाऊस
आयपीएल २०२०: पंजाबच्या विजयानंतर प्लेऑफसाठी चूरस वाढली; पाहा अशी आहे गुणतालिका