जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने भारताला ८ विकेट्सने मात दिली. त्यामुळे भारतीय संघाचे पहिल्यावाहिल्या कसोटी अजिंक्यपदाचे स्वप्न भंगले.
मात्र आता त्यामुळे भारतीय संघावर सडकून टीका होते आहे. संघात आमूलाग्र बदल करण्याची देखील मागणी केली जात आहे. या परिस्थितीत माजी भारतीय क्रिकेटपटू आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली संघाच्या मदतीला धावून आला आहे. त्याने संघाचा बचाव केला असून सगळ्यांच खेळाडूंना पाठिंबा दिला आहे.
“प्रत्येक खेळाडूचे योगदान आहे”
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या प्रवासात प्रत्येक खेळाडूने योगदान दिले आहे, अशा शब्दांत गांगुलीने भारतीय खेळाडूंचा बचाव केला. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत गांगुली म्हणाला, “कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या प्रवासात प्रत्येक खेळाडूने योगदान दिले आहे. अजिंक्य रहाणेने यात भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. तर मोहम्मद शमी आणि इशांत शर्माला देखील तुम्ही विसरू शकत नाही. एक वेगवान गोलंदाज म्हणून इशांत शर्माने १०० कसोटी सामने खेळले आहेत, जी खूप मोठी कामगिरी आहे. याशिवाय रोहित शर्मा, कर्णधार विराट कोहली यांनी देखील महत्वाचे योगदान दिले आहे. आर अश्विनने देखील स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच उत्कृष्ट प्रदर्शन केले होते.”
गांगुली पुढे म्हणाला, “भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आणि म्हणूनच हे दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले होते. पात्र ठरण्याचा निकष विजयाची टक्केवारी हा होता. पण मला आशा आहे की पुढच्या वेळी यात बदल पाहायला मिळेल. कारण मागील वर्षी कोरोनामुळे अनेक मालिका आणि सामने रद्द करण्यात आले होते.”
दरम्यान, गांगुलीने केलेल्या या बचावाने तूर्तास तरी भारतीय संघावरील टीका कमी होऊ शकते. मात्र टीकेला चोख प्रत्युत्तर द्यायचे असले तर भारतीय संघाला आगामी इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट प्रदर्शन करावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
पुन्हा WTC मध्ये भिडणार भारत-न्यूझीलंड, ‘या’ महिन्यात खेळवली जाणार मालिका
VIDEO: झेल घेण्यासाठी चाहत्याने बाथटबमधून मारली उडी आणि पुढे घडले असे काही






