येत्या काही दिवसात भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. २६ डिसेंबर पासून ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला प्रारंभ होणार आहे. या मालिकेसाठी बुधवारी (८ डिसेंबर) बीसीसीआयने १८ सदस्यीय खेळाडूंची घोषणा केली आहे. तसेच आणखी एक मोठा निर्णय देखील घेतला होता. टी२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर आता विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले आहे, तर रोहित शर्माला ही जबाबदारी देण्यात आली आहे. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. दरम्यान या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा करण्यात आला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआयचे) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्वतः विराट कोहलीला फोन करून सांगितले होते की, तो आता वनडे संघाचा कर्णधार नसणार आहे. निवड समितीतील सदस्यांचे असे म्हणणे होते की, मर्यादित षटकांसाठी एकच कर्णधार हवा. मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांनी देखील विराट कोहलीला फोन करून याबाबत कल्पना दिली होती.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “जे निर्णय घेतले जातात ते भारतीय संघाच्या भल्यासाठी घेतले जातात. भारतीय निवडकर्त्यांनी आणि बोर्डच्या अधिकाऱ्यांनी योग्य निर्णय घेतला आहे. ” सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा विराटला याबाबत माहिती मिळाली, त्यावेळी तो दुःखी होता. तसेच त्याला आश्चर्य झाले होते. त्याला याबाबत कल्पना नव्हती.
तसेच सौरव गांगुली यांनी याबाबत बोलताना म्हटले की, “हा निर्णय बीसीसीआय आणि निवडकर्त्यांनी मिळून घेतला आहे. खरं तर, बीसीसीआयने विराट कोहलीला टी२० संघाच्या कर्णधार पदावरून पायउतार होवू नको, अशी विनंती केली होती. परंतु, त्याने ते ऐकले नव्हते. निवडकर्त्यांचे स्पष्ट मत आहे की, मर्यादित षटकांसाठी एकच कर्णधार हवा. त्यामुळे विराट कोहलीला कसोटी आणि रोहित शर्माला वनडे, टी२० संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे.”
“आम्हाला रोहितच्या नेतृत्वाच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. विराट कसोटी संघाचा कर्णधार म्हणून कायम राहील. बीसीसीआयला खात्री आहे भारतीय क्रिकेट चांगल्या हातात आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दिलेल्या योगादानाबद्दल आम्ही विराटचे आभार व्यक्त करतो,” असे सौरव गांगुली म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
कसोटीत एका डावात १० विकेट्स घेणारा एजाज आयपीएल खेळण्याबाबत म्हणाला असं काही, वाचा