इंग्लंडच्या साउथम्पटन येथील द रोज बाउल स्टेडियमवर आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगला होता. कसोटी इतिहासातील या मोठ्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे तुल्यबळ संघ आमनेसामने होते. पाऊस आणि अंधुक प्रकाशाच्या व्यत्ययामुळे राखीव दिवसावर गेलेल्या या सामन्यात अखेर न्यूझीलंडने बाजी मारली. ८ विकेट्सने भारताचा धुव्वा उडवत न्यूझीलंडचे तब्बल २१ वर्षांनंतर आयसीसी चषक उंचावला. या विजयानंतर भारतीय संघाच्या परभवाचा माजी भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुली याच्यासोबत एक अनोखा योगायोग जुळला आहे.
‘दादा’ म्हणून ओळखला जाणारा माजी भारतीय दिग्गज गांगुली हा ऑक्टोबर २०१९ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अर्थात बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्त झाला होता. हे पद मिळवल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय संघाने कसोटी अजिंक्यपदच्या रुपात आयसीसीची कोणती स्पर्धा खेळली आहे. परंतु दुर्दैवाने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठूनही भारतीय संघावर पराभवाची नामुष्की आली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, गांगुलीने नव्या क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर भारतीय संघाने आयसीसी चषक गमावण्याची किंवा न्यूझीलंडने जेतेपद पटकावण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापुर्वीही २००० मध्ये असेच काहीसे घडले होते. गांगुली भारतीय संघाच्या सदस्यापासून संघाचा कर्णधार बनला होता. सचिन तेंडूलकरने कर्णधारपद सोडल्यानंतर गांगुलीच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
तो कर्णधार बनल्यानंतर त्याचवर्षी भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. योगायोगाने यावेळीही अंतिम सामन्यात भारतीय संघाचा विरोधी संघ न्यूझीलंडच होता. परंतु या सामन्यातही न्यूझीलंडने २ चेंडू राखून ४ विकेट्सने भारतावर विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी चँपियनशीप पराभवानंतरही कर्णधार विराट म्हणतोय, ‘माझ्या हा निर्णय योग्यचं होता’
‘विलियम्सन आणि कंपनी’ची कसोटी जेतेपदावर मोहोर, चॅम्पियन कर्णधाराने दिली पहिली प्रतिक्रिया
ऐतिहासिक लढतीचे नायक! आयसीसीच्या पहिल्यावहिल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ‘हे’ ठरलेत सामनावीर






