लिजेंड्स लीग क्रिकेटला आपल्या पहिल्याच हंगामात प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. भारतात या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. स्पर्धेचा पहिला हंगाम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर आता स्पर्धेचा दुसरा हंगाम येत आहे. या हंगामात वीरेंद्र सेहवागसह अनेक मोठी भारतीय नावे खेळताना पाहायला मिळणार आहेत. मात्र, बुधवारी (२० जुलै) वृत्त आले होते की, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली देखील या हंगामात दिसणार आहेत. आता स्वतः सौरव गांगुली यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
लिजेंड्स लीग क्रिकेटच्या दुसऱ्या हंगामात माजी कर्णधार सौरव गांगुली खेळणार असल्याची माहिती स्पर्धेच्या आयोजकांनी दिली होती. मात्र, आता स्वतः सौरव गांगुली यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,
“नाही ही बातमी चुकीची आहे. मी यावर्षी या स्पर्धेत खेळणार नाही”
गांगुली यांच्या या माहितीनंतर आयोजक व चाहते निराश झाले आहेत. त्यामुळे २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला गांगुली क्रिकेटमध्ये परत येणार नाही. २०१५ मध्ये, गांगुलीने अमेरिकेत सचिन ब्लास्टर्स आणि वॉर्न वॉरियर्स यांच्यातील तीन प्रदर्शनीय सामन्यांमध्ये भाग घेतला होता. परंतु त्याची उपस्थिती खूपच मर्यादित होती. सध्या बहुतेक निवृत्त खेळाडू रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज आणि इतर लीगमध्ये खेळत आहेत. तर गांगुली मैदानाबाहेर व्यस्त राहिलाय. त्याने आयपीएलमध्ये प्रशिक्षक म्हणून हात आजमावला. गेल्या काही वर्षांपासून तो बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहे.
लिजेंड्स लीग क्रिकेट सप्टेंबरमध्ये मस्कत, ओमान येथे होणार आहे. हा हंगाम २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२२ या कालावधीत पार पडेल. ज्यामध्ये ४ फ्रँचायझींचा समावेश असेल. वीरेंद्र सेहवाग, शेन वॉटसन, ओएन मॉर्गन, इरफान पठाण, युसूफ पठाण, हरभजन, मुरलीधरन, मॉन्टी पानेसर, ब्रेट ली यांसारख्या स्पर्धेतील अनेक नामवंत खेळाडूंनी क्रिकेट लीगच्या दुसऱ्या सत्रासाठी आपला सहभाग निश्चित केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है!’ राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होण्यामागे आयसीसीची मोठी रणनिती
इतर देशातील टी२० लीगमध्ये खेळणार भारतीय क्रिकेटपटू?
‘वनडे क्रिकेट बंद करून टाका…’, माजी पाकिस्तानी दिग्गजाच्या सल्ल्याने उडाली खळबळ






