भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने काल (६ मे) लॉर्ड्सच्या क्रिकेट मैदानावरील त्याचा सरावा दरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो त्याच्या कसोटी पदार्पणाच्या एक दिवसापुर्वी मैदानावर सराव करतानाचा आहे. गांगुलीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो पोस्ट करत त्याच्याशी जुळलेल्या आठवणीही सांगितल्या आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) सध्याचा अध्यक्ष गांगुलीने या फोटोसह कॅप्शन देत लिहिले आहे की, “आठवणी… १९९६ मध्ये माझ्या कसोटी पदार्पणाच्या एक दिवसापुर्वी लॉर्ड्सच्या मैदानावर सराव करताना.” Sourav ganguly shared photo of his training before test debut on instagram.
https://www.instagram.com/p/B_2Bjozgoqa/
गांगुलीने जून १९९६ला लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते. यावेळी पदार्पणाच्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत त्याने पहिल्या डावातच ३०१ चेंडूत १३१ धावा केल्या होत्या. यात त्याच्या २० चौकारांचा समावेश होता.
गांगुलीच्या या शतकी खेळीमुळे भारतीय संघाने पहिल्या डावात ४२९ धावा केल्या होत्या आणि यजमान इंग्लंड संघाविरुद्ध ८५ धावांची आघाडी मिळवली होती. तरीही, इंग्लंडने दुसऱ्या डावात दमदार खेळी केल्याने सामना अनिर्णीत राहिला.
पुढे गांगुली भारतीय संघाचा कर्णधार बनला. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २००४ला पाकिस्तानला कसोटी मालिकेत पराभूत केले होते. यासह पाकिस्तानला कसोटी मालिकेत पराभूत करणारा तो पहिला भारतीय कर्णधार बनला होता. तसेच, पुढे आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला २१ कसोटी सामन्यात विजय मिळवून देत, त्याने भारतातील यशस्वी कर्णधारांच्या यादीत आपल्या नावाची नोंद केली.
गांगुलीने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ११३ सामन्यात १६ शतकांसह ७२१२ धावा केल्या आहेत. सोबतच ३२ विकेट्सही घेतल्या आहेत. वनडेतील त्याची आकडेवारी उल्लेखनीय होती. त्याने वनडेत ३११ सामने खेळत २२ शतकांसह ११३६३ धावा केल्या आहेत. तर, १०० विकेट्ससुद्धा घेतल्या आहेत.
क्रिकेटमधील निवृत्तीनंतर गांगुली ऑक्टोबर २०१९मध्ये बीसीसीायचा अध्यक्ष बनला.
…तर मैदानावर सेलिब्रेशन करताना खेळाडू हात मिळविण्याऐवजी करतील नमस्ते!
हा विश्वविजेता कर्णधार म्हणतो, ऑलिम्पिकच्या दृष्टीने हा क्रिकेटप्रकार…
रोहित म्हणतो; ३ महिन्यांच्या गॅपनंतर फलंदाजांसमोर असणार हे सर्वात मोठे…