भारतीय कसोटी संघ सध्या बदलाच्या टप्प्यातून जात आहे. त्यामुळे अनेक तरुण खेळाडूंना संधी दिली जात आहे, पण नंबर 3 साठी योग्य फलंदाजाचा शोध अजूनही सुरू आहे. राहुल द्रविड़नंतर (Rahul Dravid) हा क्रमांक चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) आपल्या नावे केला. आता द्रविड-पुजाराची ही परंपरा पुढे नेण्यासाठी योग्य खेळाडू शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली (Saurav Ganguly) यांनी आता अशा खेळाडूचे नाव सांगितले आहे, जो दीर्घकाळ टीम इंडियासाठी नंबर 3 वर फलंदाजी करू शकतो.
इंग्लंडविरुद्धच्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीत (Anderson Tendulkar Trophy) टीम इंडियाने नंबर 3 वर साई सुदर्शन (Sai surdarshan) आणि करुण नायर (Karun Nair) यांना खेळवले, पण दोघांनीही निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे आता वेस्ट इंडिजविरुद्ध एका नव्या चेहऱ्याचा शोध सुरू आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना गांगुली म्हणाले, वय त्यांच्या बाजूने आहे. मला अजूनही खात्री आहे की त्याला संधी मिळेल. यशस्वी जयस्वाल, के. एल. राहुल, शुबमन गिल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा यांसारख्या फलंदाजांनी धावा केल्या आहेत. फक्त नंबर 3 चे स्थान थोडे कमकुवत वाटत होते. कदाचित ईश्वरनला (Abhimanyu Easwaran) तिथे खेळवता येईल.
अभिमन्यू ईश्वरनने गेल्या 6-7 वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच त्याला इंडिया ए च्या संघाचे नेतृत्वही देण्यात आले आहे. इंडिया ए साठी त्याने चांगले प्रदर्शन केले असून गेल्या 3-4 वर्षांपासून त्याला टीम इंडियामध्ये (Team india) संधी मिळत असली तरी तो प्लेइंग 11 मध्ये आपली जागा पक्की करू शकलेला नाही. ईश्वरनने 103 प्रथम श्रेणी सामन्यांत 48.70 च्या सरासरीने 7841 धावा केल्या आहेत. यात त्याने 27 शतके आणि 31 अर्धशतके झळकावली आहेत. पण, वेस्ट इंडिजविरुद्ध अभिमन्यूचं पदार्पण होण्याची शक्यता आहे.






