दक्षिण आफ्रिकेचा पुरूष क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या (ENGvsSA) दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांची मर्यादीत षटकांची मालिका आणि तेवढ्याच सामन्यांची कसोटी मालिका असे या दौऱ्याचे स्वरूप आहे. यातील वनडे मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर टी२० मालिका दक्षिण आफ्रिकेने २-१ अशी जिंकली आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना लॉर्ड्सवर खेळला गेला. यामध्ये पाहुण्या संघाने यजमानांना धक्का दिला आहे.
घरच्या मैदानावर मागील दोन कसोटी मालिकांमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा इंग्लंड चांगलाच फॉर्ममध्ये होता, मात्र दक्षिण आफ्रिकेने पहिल्याच सामन्यांत त्यांचा एक डाव आणि १२ धावांनी पराभव केला. यामुळे आंतरराष्ट्रीय कसोटी अजिंक्यपदाचा दुसरा हंगाम दिवसेंदिवस चांगलाच चुरशीचा होत चालला आहे. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडंचा पराभव केल्याने त्यांचे कसोटी अजिंक्यपदमधील आपले स्थान आणखी मजबूत झाले आहे. तर या हंगामातील शेवटचा सामना कोणत्या दोन संघात होईल याची भविष्यवाणी दिग्गज क्रिकेटपटूने केली आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू शेन वॉटसन (Shane Watson) याने २०२१-२३च्या कसोटी अजिंक्यपदाचा शेवटचा सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये होणार असे विधान केले आहे. या हंगामाची गुणतालिका पाहिली असता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे पहिल्या दोन स्थानावर उपस्थित आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या रिव्हूमध्ये वॉटसन सहभागी झाला होता. यामध्ये बोलताना तो म्हणाला, “सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघाने ज्याप्रकारचा खेळ केला आहे त्यावरून निश्चितच बाकी संघ या दोन्ही संघांना अंतिम फेरीत पोहचण्यास थांबवू शकत नाही.”
“दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरीत जागा बनवणे तेवढे अवघड वाटत नाही. ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेविरुद्धचा शेवटचा सामना वगळता दोन्ही संघांनी आतापर्यंत चांगले प्रदर्शन केले आहे,” असेही वॉटसन पुढे म्हणाला आहे.
कसोटी अजिंक्यपद २०२१-२३च्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिकेची टक्केवारी ७५ असल्याने ते ७२ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर ७० टक्केवारी आणि ८४ गुणांसह ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे.
भारत-पाकिस्तानही ठरू शकतात अडथळे
वॉटसनने दक्षिण आफ्रिका संघ अंतिम फेरीत पोहोचणार असे म्हटले असले तरी त्याने एक चेतावणीही दिली आहे. त्याने म्हटले, “दक्षिण आफ्रिकेला एक चूकही महागात पडेल, कारण भारत आणि पाकिस्तान हे त्याचीच वाट पाहत आहेत. हे दोन एशिया संघ कधीही चांगली कामगिरी करून स्पर्धेत परतू शकतात.”
डबल्यूटीसी टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर श्रीलंका आहे, तर त्यानंतर भारत आणि पाकिस्तानचा क्रमांक लागतो. गत हंगामातील उपविजेता भारत त्यांच्या उर्वरित सहा पैकी चार डबल्यूटीसी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचे यजमानपद भूषवेल तर उर्वरित दोन बांगलादेशविरुद्ध असतील. दुसरीकडे, पाकिस्तानला आपले उर्वरित पाच सामने घरच्या मैदानावर खेळायचे आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकेकाळच्या वर्ल्डचॅम्पियनला घ्यावी लागतेय व्हिल चेअरची मदत, गांजाच्या सेवनामुळे ओढावली परिस्थिती
‘भारत आणि पाकिस्तान WTCच्या अंतिम सामन्यात पोहचले नाही तर…’, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचे खळबळजनक विधान





