दक्षिण आफ्रिकेच्या संघानं अफगाणिस्तानविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना जिंकून आपली लाज राखली. जर आफ्रिकेच्या संघानं हा सामनाही गमावला असता, तर त्यांचा अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप झाला असता.
अफगाणिस्ताननं तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून आधीच मालिका खिशात घातली होती. मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. आफ्रिकेला तिसरा हा सामना जिंकून देण्यात गोलंदाजांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. याशिवाय एडन मार्करमनं शानदार खेळी केली.
शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी पूर्णपणे चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानला दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी 34 षटकांत 169 धावांत गुंडाळलं.
अफगाणिस्तानकडून सलामीला येणाऱ्या रहमानउल्ला गुरबाजनं सर्वात मोठी खेळी खेळली. त्यानं 94 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं 89 धावा केल्या. याशिवाय अफगाणिस्तानच्या आणखी दोनच फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, नाकाबा पीटर आणि फेहलुकवायो यांनी 2-2 बळी घेतले. ब्योर्न फॉर्च्युइननं 1 बळी घेतला.
लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं 33 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 170 धावा करून विजय मिळवला. धावांचा पाठलाग करताना एडन मार्करमनं 67 चेंडूंत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 69 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. ट्रिस्टन स्टब्सनं त्याला उत्तम साथ दिली. स्टब्सनं 42 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 26 धावा केल्या. मार्करम आणि स्टब्स यांनी 89 चेंडूत नाबाद 90 धावांची भागीदारी केली आणि संघाला विजयापर्यंत नेलं.
हेही वाचा –
3 युवा खेळाडू ज्यांनी दुलीप ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी केली, भारताच्या कसोटी संघात मिळू शकते जागा
संघ हरला पण पठ्ठ्याने मन जिंकलं! साई सुदर्शनने झुंजार शतक करत टीम इंडियासाठी ठोकला दावा
अश्विनच्या मुलींसोबत कर्णधार रोहितचे प्रेमळ संभाषण, व्हिडिओ जिंकेल मन!