वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत शनिवारी (21 ऑक्टोबर) दुसरा सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 399 धावा काढल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघ सुरूवातीपासून दबावात दिसला. दक्षिण आफ्रिकेने अत्यंत घातक गोलंदाजी करताना इंग्लंडचा डाव केवळ 170 धावांमध्ये संपुष्टात आणला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने आपला तिसरा विजय साजरा केला. तर, इंग्लंडचा हा वनडे इतिहासातील सर्वात मोठा पराभव ठरला.
SOUTH AFRICA HAMMERED ENGLAND BY 229 RUNS AT WANKHEDE….!!! pic.twitter.com/3AsVQREY5o
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 21, 2023
नियमित कर्णधार टेंबा बवुमा याच्या अनुपस्थितीत उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला दुसऱ्याच चेंडूवर डीकॉक याच्या रूपाने पहिला धक्का बसला. त्यानंतर दुसऱ्या गड्यासाठी रिझा हेंड्रिक्स व रासी वॅन डर डसेन यांनी शतकी भागीदारी रचली. रिझाने 85 तर डसेनने 60 धावा केल्या. या सामन्यात कर्णधार म्हणून खेळत असलेल्या ऐडन मार्करम याने 42 धावांचे योगदान दिले. डेव्हिड मिलर अपयशी ठरल्याने दक्षिण आफ्रिका संघाची मदार हेन्रिक क्लासेन व मार्को जेन्सन यांच्यावर होती. त्यांनीही निराश न करता दीड शतकी भागीदारी करत संघाला 399 पर्यंत पोहोचवले. क्लासेनने 97 चेंडूवर 109 तर जेन्सनने 42 चेंडूवर नाबाद 75 धावा केल्या.
या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ कुठेही स्पर्धेत दिसला नाही. दक्षिण आफ्रिकेच्या सर्वच वेगवान गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करताना इंग्लंडचे पहिले आठ गडी केवळ शंभर धावांमध्ये बाद केले. नवव्या गड्यासाठी गस ऍटकिन्सन व मार्क वूड यांनी 70 धावांची भागीदारी करत संघाला लाजिरवाण्या पराभवापासून रोखले. रिसे टोप्ली फलंदाजीला न आल्याने इंग्लंडचा डाव केवळ 170 धावांवर संपला व त्यांना इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
(South Africa Beat England By 229 Runs Klassen And Bowlers Shines)






