दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात यजमान संघाशी सामना झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघावर ७ गडी राखून विजय मिळवला. यासह कसोटी मालिकेपाठोपाठ दक्षिण आफ्रिका संघाने वनडे मालिका आपल्या नावे केली. मालिकेतील तिसरा व अंतिम सामना २३ जानेवारी रोजी केपटाऊन येथे खेळला जाईल.
पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात विजयाच्या आत्मविश्वासाने भारतीय संघ मैदानात उतरला. भारतीय संघाने या सामन्यासाठी संघात एकही बदल केला नाही. कर्णधार के एल राहुल व शिखर धवन यांनी ६३ धावांची सलामी दिली. मार्करमने धवनला बाद करत दक्षिण आफ्रिकेला पहिले यश मिळवून दिले. त्यापाठोपाठ, विराट कोहली खातेही न खोलता केशव महाराजच्या गोलंदाजीवर तंबूत परतला. त्यानंतर कर्णधार केएल राहुल व रिषभ पंत की जोडी जमली. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी शतकी भागीदारी रचली. शतकाकडे वाटचाल करत असलेल्या रिषभला तबरेज शम्सीने बाद केले. त्याने ८५ धावा केल्या. दुसरीकडे राहुल ८५ धावा काढून बाद झाला. श्रेयस अय्यर व्यंकटेश हे दोघे या सामन्यातही पूर्णत अपयशी ठरले. अखेरीस शार्दुल ठाकूर व रविचंद्रन अश्विन यांनी अनुक्रमे नाबाद ४० व २५ धावांचे योगदान दिल्याने भारतीय संघ २८७ पर्यंत मजल मारू शकला.
भारतीय संघाने दिलेल्या आव्हानाचा प्रत्युत्तरात क्विंटन डी कॉक व जानेमन मलान या सलामी जोडीने दक्षिण आफ्रिकेला २२ षटकात १३२ धावांची शानदार सलामी दिली. शार्दुल ठाकूर याने डी कॉकला ७८ धावांवर बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर आलेल्या कर्णधार टेंबा बवुमाने ३५ धावांचे योगदान दिले. शतकाच्या दिशेने वाटचाल करत असलेला मलान दुर्दैवी ठरला. जसप्रीत बुमराहने त्याला ९१ धावांवर त्रिफळाचीत केले.
दोन गडी पाठोपाठ बाद झाल्याने यजमान संघ दबावात येईल असे वाटत होते. मात्र, पहिल्या सामन्यातील शतकवीर रॅसी वॅन डर ड्युसेन व ऐडन मार्करम यांनी प्रत्येकी नाबाद ३७ धावांच्या खेळीचा करत संघाला विजयापार नेले.