येत्या काही दिवसात दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका संघात २ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने १६ सदस्यीय संघाची घोषणाही केली आहे. परंतु या मालिकेची सुरुवात होण्यापूर्वी यजमान दक्षिण आफ्रिका संघावर मोठे संकट आले आहे. त्यांचे १६ पैकी १० सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेदरम्यान झाली लागण
देशांतर्गत क्रिकेटमधील प्रथम श्रेणी सामन्यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रथम श्रेणी स्पर्धा पुढील महिन्यापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. रविवारी (१३ डिसेंबर) प्रथम श्रेणी स्पर्धेची सुरुवात झाली होती. या स्पर्धेमध्ये एकूण तीन सामने खेळले जाणार होते. परंतु, पहिल्या सामन्यात सहभागी झालेल्या संघांपैकी पाच खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिका कसोटी संघातील फक्त तेच खेळाडू निगेटिव्ह आढळले आहेत, जे प्रथम श्रेणी स्पर्धेचा भाग नव्हते. यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डी कॉकचा समावेश आहे. सोबतच फाफ डू प्लेसिस, टेम्बा बावुमा, एन्रीच नॉर्किए, काईल वेरीयेने, ग्लेंटन स्टरमन यांनाही कोरोना लागण झालेली नाही.
कसोटी मालिका होणे निश्चित
क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने म्हटले आहे की, “खेळाडूंच्या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याच्या प्रकरणाचा कसोटी मालिकेवर कसलाही परिणाम होणार नाही. जैव- सुरक्षित वातावरणात दाखल होण्यापूर्वी प्रत्येक खेळाडूची चाचणी केली जाईल. ज्या खेळाडूंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह येईल, त्यांनाच जैव- सुरक्षित वातावरणात प्रवेश मिळेल.”
‘बॉक्सिंग डे’ कसोटीने होणार सुरुवात
श्रीलंका व दक्षिण आफ्रिका संघातील कसोटी मालिकेची सुरुवात २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याने होणार आहे. तसेच दुसरा व अंतिम कसोटी सामना ३ ते ७ जानेवारी दरम्यान जोहान्सबर्गमध्ये होणार आहे.
असा आहे दक्षिण आफ्रिका संघ
क्विंटन डी कॉक (कर्णधार व यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा, एडिन मार्कराम, फाफ डू प्लेसिस, ब्युरन हेंड्रिक्स, डीन एल्गर, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, रस्सी वॅन दर दसन, सारेल इर्वी, एन्रीच नॉर्किए, ग्लेंटन स्टरमन, वियान मल्डर, कीगन पीटरसन, काईल वेरीयेने
महत्त्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय, ‘या’ खेळाडूला सोपवले कसोटी संघाचे कर्णधारपद
ब्रेकिंग! दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघातील वनडे मालिका अनिश्चित काळासाठी स्थगित
दक्षिण आफ्रिका वि. इंग्लंड : पहिली वनडे पुन्हा रद्द; यावेळी खेळाडू नाही हॉटेल स्टाफला कोरोनाची लागण






